परभणी/सेलू (Selu Crime Case) : तालुक्यातील डिग्रस खुर्द शिवारातील एका शेतात ६० वर्षीय महिलेचे कुजलेले प्रेत रविवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२च्या सुमारास आढळून आले.या महिलेचा मृत्यू तीन दिवसापूर्वी उष्माघात अथवा विषारी प्राण्याच्या दंषाने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.याबाबतची माहिती याप्रमाणे तालुक्यातील डिग्रस खुर्द येथील शेतकरी रामकिशन बुरे यांच्या शेतात गट क्रमांक ४६ मध्ये एका ६० वर्षीय महिलेचे प्रेत आढळल्याची माहिती शेतकऱ्यांनी पोलीसांना देतात घटनास्थळी जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल, पोलीस निरीक्षक दिपक बोरसे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस नायक माधव कांगणे, पो.ना.अमोल वाडेकर यांनी भेट दिली. मयत ६०वर्षीय महिलेचे प्रेत तीन दिवसापासून घटनास्थळी पडले असल्याने चेहरा विद्रूप झाला होता. रविवार १३ ऑक्टोबर रोजी शेतकरी शेतात गेले असता हा प्रकार आढळून आला.
त्यानंतर घटनास्थळी पोलीसांनी भेट देऊन रुग्णवाहिकेतून प्रेत सेलू जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.या महिले जवळ एका कागदात शेतातील जमा केलेले सोयाबीन आढळून आले. शिवाय महिलेच्या हाताचे नखे वाढलेले असल्यामुळे ही महिला भोळसर असावी तसेच शेतातील सोयाबीन जमा करताना एखाद्या विषारी प्राण्याच्या दंषाने अथवा उष्माघाताने या महिलेचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान ही महिला परिसरातील असावी परंतु तिची अद्यापही ओळख मात्र पटली नाही. शेतकरी रामकिशन बुरे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद सेलू पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख हे पुढील तपास करत आहेत.