परभणी/सेलू (Selu Tehsil Office) : शहरातील तहसील कार्यालयात जन्म दाखल्यासह उत्पन्न प्रमाणपत्र व इतर कायदपत्रासाठी नागरीकांना खेटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे सध्या महसूल पंधरवाडा सूरु असून नागरीकांना वेळेवर आवश्यक ती प्रमाणपत्रे वाटप करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या आहेत. तरीही (Selu Tehsil Office) सेलू तहसील कार्यालयात आडवणूक होत असल्याच्या तक्रारी नागरीकांतून येत आहेत. वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पूर्वी जन्म, मृत्यूचे दाखल मनपा कार्यालयातून मिळत होते. आता जन्माचा दाखला तहसील कार्यालयातून मिळवावा लागत आहे. त्याची प्रक्रियाही किचकट आहे. सर्वसामान्य नागरीकांना या प्रमाणपत्रासाठी वकीलांशी सल्लामसलत करावी लागते. त्यानंतर प्रस्ताव (Tehsil Office) तहसील कार्यालयात दाखल करावा लागतो. सध्या आरटीईसह इतर प्रायमरी वर्गात प्रवेश घेण्यासाठी पालकांची गरबड सुरु आहे. बहूतांश पालकांनी बालकांच्या जन्मावेळेस दाखला काढलेला नाही.
त्यांची आता लगबग सुरु आहे. शिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, निराधार योजना व इतर शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी गर्दी होत आहे. (birth certificate) जन्म दाखल्यासाठी येणार्यांची संख्याही अधिक आहे. मात्र वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे कर्मचारी आणि येणार्या नागरीकांचे खटके उडत आहे. मात्र चिरीमिरी देणार्यांचे जन्मदाखले आणि उत्पन्न दाखले तात्काळ मिळत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.