दोन कंत्राटदारांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Sengaon Crime) : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ते केंद्रा रस्त्यालगत आठ किलोमिटरचे खोदकाम करून सार्वजनिक मालमत्तेचे २६ लाख रुपयांचे नुकसान करणाऱ्या दोन कंत्राटदारावर गोरेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईवरच शंका उपस्थित होत असून या संदर्भात उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता नॉटरिचेबल असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
गोरेगाव ते केंद्रा या मार्गावर एका कंपनीचे केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (Sengaon Crime) भुमीगत केबल टाकण्यासाठी संबंधित कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रितसर परवानगी देखील घेतली होती. त्यानंतर कंत्राटदारांनी खोदकाम सुरु केले. मात्र तब्बल आठ किलो मिटर अंतराचे खोदकाम नोव्हेंबर महिन्यात झाल्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली.
या मार्गावर खोदकामाची परवानगी असल्यानंतर त्यांनी रस्त्यापासून काही अंतरावर खोदकाम करणे अपेक्षीत असतांना रस्त्याला लागूनच खोदकाम केल्याचा आरोप बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.या प्रकरणात हिंगोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाने संंबंधित कंत्राटदारांना वारंवार कळविल्यानंतरही त्यांनी रस्त्याच्या लागूनच खोदकाम केले.
या प्रकरणात आज बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता गजानन खोरणे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये गोरेगाव ते सवना व गोरेगाव ते केंद्रा मार्गाच्या साईटपट्याचा मुरुम नियमबाह्य खोदकाम करून सार्वजनिक मालमत्तेचे २६ लाख रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून गोरेगाव पोलिसांनी सचिन सोळुंके, पांडूरंग काळे (रा. मालेगाव, जि. नाशीक) यांच्या विरुध्द (Sengaon Crime) गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक नितेश लेनगुळे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, सदर प्रकार नोव्हेंबर महिन्यात घडला असतांनाही बांधकाम विभागाने तातडीने कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित होते आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारवाईवर शंका उपस्थित केली जात आहे.