आ. रामदास मसराम यांनी घेतली झाडाझडती
देसाईगंज (Paddy procurement center) : देसाईगंज तालुक्यातील फरी येथील आरमोरी सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती मर्या. आरमोरी या धान खरेदी केंद्रावर आ. रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता गंभीर अनियमितता आढळून आली. यामुळे आ. मसराम यांनी उपस्थित कर्मचार्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
आ. मसराम यांच्या पाहणीदरम्यान शेतकर्यांनी धान खरेदीत काटा न करता प्रती कट्टा ४० किलो ५०० ग्रॅमप्रमाणे धान घेतले जात असल्याची तसेच प्रत्येकी ५०० ग्रॅमची ‘देणगी’ घेतली जात असल्याची तक्रार केली.
खरेदी प्रक्रिया टोकन नंबरनुसार न होता अनेक शेतकर्यांचे नोंदणीविना धान खरेदी झाल्याचे आढळून आले. दिनांक १ ते ८ जानेवारीदरम्यान २७ शेतकर्यांचे नोंदणी नसताना धान खरेदी झाल्याची माहिती समोर आली. तसेच वजन पावती न देता धान खाली करून घेतल्याच्या तक्रारीही शेतकर्यांनी मांडल्या.
पंचनामा दरम्यान स्टॉक रजिस्टर, सातबारा व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. गोदामातील धान पोत्यांची शास्त्रोक्त मांडणी नसल्याने प्रत्यक्ष साठ्याची मोजणी करणे शक्य झाले नाही. केंद्र व्यवस्थापकांच्या माहितीनुसार दिनांक १२ जानेवारी २०२६ अखेर ४६५८.४० क्विंटल धान खरेदी झाल्याचे नमूद करण्यात आले.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. रामदास मसराम यांनी केली आहे. याप्रसंगी धनपाल मिसार, परशुराम ठाकरे, सागर वाढई ,मनोज मने, व्यवस्थापक माकडे उपस्थित होते




