आपले सरकार सेवा केंद्राच्या निवड यादीवर आक्षेप!
मानोरा (Setu Seva Kendra Scam) : मानोरा तालुक्यातील सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाला असुन आपले सरकार सेवा केंद्राच्या निवड यादीवर आक्षेप घेत अन्यायग्रस्त उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. १२ फेब्रुवारी रोजी धडक देत न्यायासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
महिला आरक्षणालाही फाटा!
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावागावात पात्र उमेदवारांना आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अनेकांनी अर्ज सादर केले. परंतु आवेदन करता उमेदवाराला किती गुण मिळाले, याची यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. तसेच महिलाकरिता आरक्षणही नेमण्यात आले नाही. तसेच सीएससी आयडी नाही त्या उमेदवाराचे नाव निवड प्रक्रिया श्रेणीमध्ये आहेत. अनेक अनुभव असलेल्या सीएससी आयडी असताना डावलण्यात आलेले आहे. काही गावात दुसऱ्याच गावातील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. एकूणच या निवड प्रक्रिये गैर व्यवहार झाल्याचा आरोप करत अन्यायग्रस्त उमेदवारांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी प्रफुल दुबे, साखरकर आदीसह इतर उमेदवारांची उपस्थिती होती.




