मानोरा (crop insurance) : निसर्गाच्या लहरीपणामुळे मानोरा तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असुन यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. खरीप हंगामात विमा भरला असता नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. अश्या परिस्थितीत पंचनामा करण्यासाठी आलेल्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी बाजार मांडला असुन नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामा करण्यासाठी प्रति पिक २०० तर सातबारा १००० रुपयांचा भावच ठरविला आहे. त्यामुळे यातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. दरम्यान हा सर्व प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे.
मानोरा तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला व ज्यांनी ७२ तासात विमा कंपनीकडे तक्रारी केल्या, अश्याच शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करण्याचे काम सध्या विमा प्रतिनिधींकडून सुरू आहे. त्यासाठी विमा कंपनीकडून नेमण्यात आलेले प्रतिनिधी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करत आहेत. यात विमा कंपनीचे प्रतिनिधी हे प्रती पिक व प्रति गट क्रमांक दोनशे ते हजार रुपयांपर्यंत रक्कम उखळत. जास्त पैसे दिले तर जास्त हेक्टर नुकसान दाखविले जाईल, असे सांगत प्रतिनिधी पैसे उखळत आहेत. एका शेतकऱ्याने चार ते पाच पिकांची पेरणी केलेली आहे. तसेच एका शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे अनेक खाते आहेत. या प्रकाराकडे कृषि विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी संतप्त शेतकरी वर्गातून होत आहे.