पवार साहेबांबद्दलची ‘ती’ विधाने मनाला वेदना देणारी !
बुलडाणा (Sharad Pawar) : वयाने कर्तृत्वाने व नेतृत्वाने पवार साहेब श्रेष्ठच आहेत. त्यांच्याबद्दल अलीकडच्या काळात वैयक्तिक पातळीवर जाऊन केली जाणारी विधाने मनाला वेदना देणारी असल्याचे मत माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे डॉ. शिंगणे हे अजितदादा गटाचे आमदार असूनही, त्यांनी (Sharad Pawar) शरद पवारांबद्दलच्या विधानाने ही उद्विग्नता व्यक्त केली आहे !
राजकारणामध्ये परिस्थितीनुसार किंवा जनभावनेच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय घ्यावे लागतात, मात्र याचा अर्थ ज्या नेतृत्वाने आपल्याला घडवले किंवा मोठे केले त्याच्याबद्दल काहीही ऐकून घेणे मनाला वेदना देणारे आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी नुकतेच पुण्यात आदरणीय (Sharad Pawar) शरद पवारांवर भ्रष्टाचारासंदर्भात अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. राजकारणात गट, तट मतभेद रुसवे-फुगवे असू शकतात. परंतु ते वैयक्तिक पातळीवर जाता कामा नये. शरद पवार (Sharad Pawar) हे संपूर्ण महाराष्ट्राचे आदरणीय आहेत. देशाच्या राजकारणातही त्यांनी आपली वेगळी छाप ठेवली आहे.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्यांनी लोकहित जपले आहे. अशा नेतृत्वाबद्दल “भटकती आत्मा” किंवा “भ्रष्टाचाराचे कुरण” अशा खालच्या पातळीवर केली जाणारी विधाने निश्चितच निंदनीय असून मनाला वेदना देणारे आहेत. महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक म्हणजे पाच वेळा मुख्यमंत्री, देशाच्या राजकारणात संरक्षण मंत्री, कृषिमंत्री अशी अनेक पदे भूषविल्यानंतर आयुष्याच्या उतारवयाच्या टप्प्यामध्ये अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल खालच्या पातळीशी विधाने करणे संयुक्तिक नाही. राजकारणामध्ये लढाई किंवा मतभेद हे विकासासाठी लोकहितासाठी असावेत. वैयक्तिक पातळीवर जाऊन अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वाबद्दल टिप्पणी होऊ नये, अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे.. असेही आ. डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) नमूद केले आहे