कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत छत्रपती संभाजी नगर येथे पक्षप्रवेश
पाथरी (Sharad Pawar) : विधान परिषद सदस्य पदाचा कार्यकाळ संपण्याच्या दिवशीच आ. बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शनिवार 27 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आ. दुर्राणी यांनी सुबह का भुला शाम को लोटा तो उसे भुला नही कहते म्हणत पक्षात घरवापसी केली. यावेळी त्यांच्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर पक्षप्रवेशाची होती चर्चा
शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणुन आ. दुर्राणी (Babajani Durrani) यांना राजकारणात ओळखले जाते .राष्ट्रवादी काँग्रेस कडून पाथरी मतदारसंघात एक वेळ विधान सभेचे आमदार तर दोन वेळा राज्य विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांना पक्षाने संधी दिली होती. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटात प्रवेश केला होता .त्यासाठी पाथरी तालुक्यातील स्थानिक राजकारण कारणीभूत होते. परंतु मागील अनेक महिन्यांपासून विचारधारेच्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या सोबत राहावे लागत असल्याने ते अस्वस्थ होते. दरम्यानगुरुवार 25 जुलै रोजी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील (Jayant Patil) यांची त्यांनी पाथरी येथील निवासस्थानी भेट घेतली होती. तत्पुर्वी मतदार संघातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला होता.
याचवेळी ते पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. शुक्रवार 26 जुलै रोजी संध्याकाळी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये भेट घेतली व त्यानंतर शनिवार 27 जुलै रोजी सकाळी आठ वाजता तब्बल 40 मिनिट हॉटेल रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवारांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर पक्ष प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवन मध्ये झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये त्यांनी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, मराठवाडा संपर्कप्रमुख जयसिंगराव गायकवाड, परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, एमजीएम संस्थेचे विश्वस्त बाबुराव कदम, द्वारकदास पाथरीकर, विजयराव भांबळे, जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे, संजय वाघचौरे, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तायडे, सोशल मिडिया मराठवाडा अध्यक्ष निखिल कदम यांच्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने आलेल्या पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेबांचा उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मुळात हा पक्षप्रवेश नाहीच! मी फक्त माझ्या घरी परतलो आहे, अशी भावना आज मनात आहे. पवार साहेबांनी पुन्हा एकदा सन्मानाने माझे स्वागत केले याचा मनस्वी आनंद आहे. 1980 पासून पवार साहेबांसोबत काम करतो आहे, पुन्हा एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार. साहेब आपण जी जबाबदारी द्याल, ती पूर्ण ताकदीने पार पाडेल. जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहील असा शब्द देतो.
– आ .बाबाजानी दुर्राणी