Sharad Pawar On EVM:- महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला आहे. विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला (EVM) जबाबदार ठरविण्यात आले आहे. राजकीय पक्ष केवळ भाष्य करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले. ९५ वर्षीय बाबा आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी महात्मा फुले (Mahatma Fule) वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
राज्याच्या निवडणुकीत असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते..
शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा (Elections) निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे. निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. पण राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “काही लोकांनी ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते. आमची कमतरता होती की, आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल, असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग (Election Commission) या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण निकालानंतर आता तथ्य दिसत आहे.”
अन्यथा संसदीय लोकशाही उध्वस्त होईल
“बाबा आढाव यांच्या उपोषणाने एकप्रकारचा दिलासा सामान्य माणसांना मिळत आहे. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली. पण त्यांनी एकट्यानेच भूमिका घेणे पुरेसे नाही. जनतेचाही यासाठी उठाव व्हायला हवा. संसदेत आम्ही मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला बोलू देत नाहीत. रोज सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलायला उभे राहतात. पण त्यांना बोलू दिले जात नाही. मागच्या सहा दिवसात संसदेत देशाच्या एकाही प्रश्नाची चर्चा होऊ शकलेली नाही”, असेही शरद पवार म्हणाले.