शेतकरीविरोधी महायुती सरकारला लाज वाटली पाहिजे- ना. दानवे
बुलढाणा (Shetkari Akrosh Morcha) : जालिंदर बुधवत या निष्ठावंत शिवसैनिकाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज सोमवार 23 सप्टेंबर रोजी बुलढाणा विधानसभा मतदार संघातून काढण्यात आलेला मोर्चा अतिविराट स्वरूपाचा आहे. महायुतीचे हे राज्य सरकार असो की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणार आहे. एवढ्या प्रचंड उकाड्यातही आपण हजारोंच्या संख्येने मोर्चात (Shetkari Akrosh Morcha) आलात. उन्हामुळे डोकं तापल आहे तस मन सुद्धा तापवा आणि मशाल पेटवा. बुलढाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक हा तुम्हा सगळ्यांना पुसावाच लागेल, असे आवाहन शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केले.
आक्रोश मोर्चातून जालिंदर बुधवंतानी ओढला महायुती सरकारवर आसूड
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आक्रोश मोर्चा (Shetkari Akrosh Morcha) पोहोचल्यानंतर याठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना नेत्यांनी मार्गदर्शन केले. जिजामाता व्यापारी क्रीडा संकुलाच्या मैदानाजवळून दुपारी साडेबाराच्या सुमारास महापुरुषांच्या नावाचा जयघोष करत या मोर्चाला सुरुवात झाली. प्रचंड घोषणाबाजी आणि संतप्त भावना घेऊन शेतकरी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला.. जय भवानी जय शिवाजी.. शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्या महायुती- सरकारचं करायचं काय, खाली मुंडक-वर पाय.. अशा घोषणांनी बुलढाणा दणाणून गेले. सुरुवातीला कला पथक असलेले ट्रॅक्टर, बैलगाड्यांमध्ये बसलेले शेतकरी त्यांच्या हातात असलेले वेगवेगळे फलक, नंतर खा. अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व अन्य पदाधिकारी आणि त्यांच्या पाठीमागे शेतकरी बांधव, महत्त्वाचे म्हणजे मोठ्या संख्येने महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. बाजार लाईन मध्ये मोर्चाचे पहिले टोक असेल तर शेवटची टोक हे संगम चौकापर्यंत होते. मोर्चाची विराटता यातून लक्षात येईल. संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन व कारंजा चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी धडकला. यावेळी नेत्यांनी मार्गदर्शन केले.
रेकॉर्ड ब्रेक मोर्चाने बुलढाणा दणाणले; हजारो शेतकऱ्यांचा “आक्रोश”
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) म्हणाले की, या देशात मणिपूर मध्ये आजही अत्याचार सुरू आहेत मणिपूर मध्ये लाडक्या बहिणी नाहीत का पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आतापर्यंत ही मणिपूरमध्ये गेलेले नाहीत निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम सुरू आहे कांदा आणि सोयाबीनच्या निर्यात शुल्का बाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. जो आमदार आमच्या बहिणीची जमीन लाटतो वर लाडक्या बहिणीही म्हणतो. हे विकल्या गेलेले गद्दार आहेत. (Shetkari Akrosh Morcha) उद्याच्या निवडणुकीत तुम्हालाच हा कलंक पुसायचं आहे. जिल्हाधिकारी आणि एस. पी. यांचे देखील डोळे बंद आहेत का? असा सवाल उपस्थित केला. स्थानिक आमदार गाडी धुवायला पोलीस ठेवतो. पोलिसाच्या पत्नीला जाऊन विचारा की तुमचा पती आमदाराची गाडी धुतो तर चालेल का? काय ती माऊली उत्तर देईल. तुम्ही पण गुलाम झाला आहात का हे जाहीर करा, असे आवाहन एक प्रकारे जिल्हास्तरीय प्रशासकीय मुख्य शिलेदारांना करून खासदार सावंत यांनी शाल जोडीतून टीकेची झोड उठवली.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांचा रुद्रावतार भाषणातून दिसला. थेट उपस्थित गर्दीच्या मनाला हात घालत त्यांनी अतिवृष्टीचे पैसे मिळाले का ? पिकविमा मोबदला मिळाला का ? अशी हाक शेतकऱ्यांना दिली तर गर्दीतून उत्तर आले नाही. या हाकेला पुढे जात दानवे म्हणाले की, शेतकरी मेला पाहिजे असं महायुती सरकारच धोरण आहे. करोड रुपयांचे कर्ज बुडवून पळून जाणाऱ्यांना हे सरकार साथ देते, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही.
५० खोकेवाल्यांना पैसे द्यायला यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांना द्यायला नाहीत. (Shetkari Akrosh Morcha) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. पिकाला भाव नाही, पिक विमा नाही, सरकारला याची लाज वाटली पाहिजे असे दानवे म्हणाले. इथला आमदार स्वतःला धर्मवीर म्हणून घेतो, तो तर गद्दार आहे. कमिशनखोरीमध्ये गुंतलेले हे वाचाळवीर असून यांच्या जिभेला काही हाड.. अशी थेट टीका दानवे यांनी केली. पोलिसांनी देखील शेपूट घातलेले असल्याचे म्हणत रीटा उपाध्याय नावाच्या महिलेची जमीन हडपलेली आहे. ती महिला न्याय मागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आपण आहोत, जिल्हाधिकारी यांनी त्या बाईची जमीन मोजून दिली पाहिजे. दोन महिने थांबा सरकार बदलणार आहे असा दम देखील दानवे यांनी भरला. लाडक्या बहिणीची घोषणा करतात, खोटे आश्वासन देतात.
आज तेल, तूरडाळ यांचे भाव काय आहेत? गॅस चारशे रुपये होता, तो आज अकराशे रुपये आहे. एकीकडे बहिणी सुरक्षित नाहीत. आज त्यांना संरक्षणाची गरज आहे. कायदा व सुव्यवस्थेची धिंडवडे निघाले असून या गद्दार सरकारला पराभूत करावंच लागेल, असेही अंबादास दानवे म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा म्हटले होते की एकही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही. बुलढाणा जिल्ह्यात ११५ आत्महत्या झाल्या आहेत. सोयाबीन, कापसाचे भाव काय आहेत. सोयाबीनला दहा हजार रुपयाचा भाव असावा अशी मागणी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ते स्वतःची मागणी देखील विसरले आहेत का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणे -घेणे नाही अशी टीका दानवे यांनी केली. जालिंदर बुधवत यांनी १५१ गावात मशाल यात्रा (Shetkari Akrosh Morcha) काढली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा मोर्चा अतिविराट स्वरूपाचा असून १५१ गावात गेलेली मशाल, ही गावे आणि बुलढाणा शहर यापूर्ती मर्यादित राहणार नाही. ही मशाल मुंबईत गेल्याशिवाय थांबणार नाही, विधानसभेवर निष्ठावंतांचा भगवा फडकणार असे सूचक वक्तव्य अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केले.
जालिंदर बुधवत यांनी सुरुवातीला मोर्चाच्या (Shetkari Akrosh Morcha) आयोजनाची भूमिका विषद केली. शिवसेना ही सत्तेसाठी नाही तर समाजासाठी आहे. झोपी गेलेल्या सरकारला जाग करण्याचं काम या मोर्चातून करायचा आहे. शेतकऱ्यांची अवस्था कठीण आहे. युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत असे सांगून सरकार विरुद्धचा आपला रोष व्यक्त केला. तर प्रा. खेडेकर यांनी सरकारने लाडका बहीण लाडका भाऊ या सोबतच “लाडका वाचाळवीर” अशी देखील योजना आणावी. त्यामध्ये संभाजीनगरचा शिंदे गटाचा एक शिरसाट, राष्ट्रवादी अजित दादा सोबत असलेले मिटकरी, नारायण राणेंचा पोरगा , बुलढाण्याचा आमदार यांच्यात स्पर्धा घेतली तर बुलढाण्याचाच गद्दार जिंकेल अशी उपरोधिक कोपरखळी मारली. चिंता करू नका.बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकदा आमदार झालेला माणूस दुसऱ्यांदा आमदार सलग होत नाही, असे सांगितले. जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात निघालेला हा शेतकऱ्यांचा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा आहे असे खेडेकर म्हणाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राज्यपाल यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.