ग्राम पंचायत व विभागाचे दुर्लक्ष
देवरी (Shilapur Gram Panchayat) : तालुक्यातील शिलापूर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या बोरगाव येथील वॉर्ड क्र.१ मध्ये जीर्ण विहिर आहे. सदर विहिरीचा उपयोग शुन्य असूनही त्या विहिरीला बुजविण्याचे काम ग्राम पंचायत अथवा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले नाही. यामुळे ही विहिर धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. जि. प. शाळेसमोरच विहिर असल्याने चिमुकल्यांचा वावर असतो. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, डोकेबंद करून असलेल्या ग्राम पंचायतीचे याकडे लक्ष जाताना दिसून येत नाही. यामुळे एखाद्या अप्रिय घटनेनंतरच दखल घेणार का? असा प्रश्न गावकर्यांकडून उपस्थित केला जात आहे.
बोरगाव येथे वॉर्ड क्र.१ येथे जुनी विहिर आहे. सदर विहिर जीर्ण झाल्याने मागील १५ ते २० वर्षापासून या विहिरीच्या उपयोग केला जात नाही. विहिरीला सुरक्षात्मक कठडे असले तरी ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोकादायक स्थितीत आले आहेत. विशेष म्हणजे, सदर विहिर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. शाळेतील मुलांना खेळण्यासाठी मैदान नसल्यामुळे शाळेसमोरील खुल्या आवारामध्ये मुलं खेळ खेळत असतात. सदर विहीर पूर्णतः जीर्ण झालेली असून, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. विहिरलगत थोडासा मैदान असल्यामुळे शाळा प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण देण्यासाठी उपयोगात आणला जातो.
त्यामुळे कधीही धोका निर्माण होऊ शकतो. तर दुसरीकडे नजिकच समाज भवन असल्याने या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात. यामुळे जीर्ण अवस्थेत पडून असलेली ही विहिर धोकादायक ठरत आहे. असे असूनही ग्राम पंचायत प्रशासनाकडून सातत्याने विहिर बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गावकर्यांना या संदर्भात प्रशासनाला माहिती देवून परिस्थितीत लक्षातही आणून दिली. परंतु, डोळेबंद करून असलेल्या ग्राम पंचायत प्रशासनाचे समस्येकडे लक्ष जाताना दिसून येत नाही. त्यामुळे एखाद्या अप्रिय घटनेनंतरच झोप उघडणार काय? असा प्रश्न संतप्त गावकर्यांकडून केला जात आहे.
विहीर ठरली डास उत्पत्तीचे केंद्र
बोरगाव येथे जीर्ण असलेली विहिर मागील १५ वर्षांपासून उपयोग नाही. यामुळे विहिरीत दुषित पाणी साचून आहे. शिवाय केरकचरा व पावसाळ्यातील पाण्याची साठवणूक होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे ही विहिर रोगराई उत्पत्तीचे केंद्र ठरली आहे. या प्रकारामुळे गावकर्यांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य विभागाचाही याकडे कानाडोळा आहे. यामुळे ग्राम पंचायत व तत्पर असलेला आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.