परभणी/गंगाखेड(Parbhani):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या वतीने सोमवार रोजी येथील शासकीय विश्रामगृहावर विधानसभा प्रभारींच्या उपस्थितीत आयोजीत लाडकी बहिण योजनेच्या जनजागृती बैठकीत शिवसैनिकांनी केलेल्या तक्रारीवरून आपसात बोलाबोली होऊन शाब्दिक गोंधळ उडाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गंगाखेड येथील शिवसेनेत (Shivsena)चाललंय तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चाललंय तरी काय ?
राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीसाठी सोमवार ३० सप्टेंबर रोजी गंगाखेड शहरातील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेचे पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके, महिला उपनेते आशाताई विचारे, जिल्हा संपर्क प्रमुख माजी खा. ॲड. सुरेशराव जाधव, दोन्ही महिला जिल्हाप्रमुख, विधानसभा प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी, शहर प्रमुख अर्जुन पुरनाळे आदींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू होताच आम्हाला विचारात घेतल्या जात नाही. काही विचारले तर वरिष्ठ पदाधिकारी शिवराळ भाषेत बोलून पान उतारा करतात. बैठकीमध्ये बोलाविल्या जात नाही असे म्हणत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त तक्रार केल्याने आपसात बोलाबोली होऊन शाब्दिक गोंधळ उडाल्याचे चित्र यावेळी उपस्थित असलेल्या महिला अन्य शिवसैनिकांना पहावयास मिळाले. गंगाखेड शहरात बैठक असून सुद्धा या बैठकीसाठी बोलवले नसल्याची तक्रार ही या दरम्यान काही शिवसैनिकांनी उपस्थित मान्यवरांसमोर केली. गंगाखेड येथे आयोजीत बैठकीत शिवसैनिकांमध्ये बोलाबोली वरून शाब्दिक गोंधळ उडाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे ही पहावयास मिळाले आहे.