अतिवृष्टीच्या संकटात शिवसेना शेतकऱ्यांसोबत!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना दिलासा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना दिलासा
-महादेव कुंभार
लातूर (Uddhav Thackeray) : होतं नव्हतं ते सगळं, मातीमोल झालं झालं… सरकारने जाहीर केलेल्या मदतीतून पेरणीचा खर्चही निघत नाही, आम्ही जगायचं कसं? असा सवाल करीत अतिवृष्टीग्रस्तांनी शेतकरी किमान 50 हजार रुपये मदत सरकारने द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावर ठाकरे यांनी सर्वांना दिलासा देत ‘कोणीही खचून जाऊ नका, वेड वाकडं पाऊल टाकू नका, अतिवृष्टीच्या या संकटात शिवसेना तुमच्यासोबत आहे’, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी लातूर जिल्ह्यातील तांदूळवाडी, काटगाव परिसरात अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणीवेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्या शेतकऱ्यांचे मनोगत जाणून घेतले. त्या शेतकऱ्यांना दिलासा दिला. सरकारकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू, असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांच्या शेती, घराचे, गुराढोरांचे, शेती अवजारांचे तसेच इतर साहित्याचे झालेले नुकसान मोठे आहे. यासाठी सरकारला आम्ही अधिकाधिक मदत देण्यास भाग पाडू, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
काटगाव येथील पाहणी करताना व शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना नेते खा. संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आ. मिलिंद नार्वेकर, आ. प्रवीण स्वामी, माजी आ. धिरज देशमुख, माजी आ. दिनकरराव माने, शिवसेना सहसंपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, सी. के. मुरळीकर, सौ. जयश्रीताई उटगे, सौ. सुनीताताई चाळक, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महानगरप्रमुख सुनील बसपुरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा!
मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यातील शेतकरी अतोनात संकटात आहे. लाखो हेक्टर शेती अती पाण्याने संकटात आली आहे. सोयाबीन, कापूस, मका आणि उसाची शेती नष्ट झाली आहे. राज्य सरकारने सरसकट मदतीची घोषणा करून बळीराजाला या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी याप्रसंगी उद्धवसाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी बोलताना केली.