बुलढाणा (Sanjay Gaikwad) : शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली असून, 45 जणांच्या पहिल्याच यादीत बुलढाणा जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हा एकच आवाज, पुन्हा घुमणार असून.. मेहकर विधानसभा मतदारसंघातून डॉ. संजय रायमुलकर (Dr. Sanjay Raimulkar) यांना तब्बल चौथ्यांदा शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेना पक्षात जेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले, त्यावेळी त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना आमदारांनी साथ देऊन सुरत मार्गे गोहाटी गाठले होते. साथ दिलेल्याना वाऱ्यावर न सोडता एकनाथ शिंदे यांनी, या दोन्ही आमदारांना पुनश्च पहिल्या यादीत स्थान देऊन त्यांचा सन्मान केला आहे. विशेष म्हणजे या दोघांनी उमेदवारीसाठी कुठलाही अर्ज केला नव्हता व कुठलेही शिष्टमंडळ घेऊन गेले नव्हते, अगदी त्यांना घरबसल्या उमेदवारी मिळाली आहे. सोबत आलेल्या 50 आमदारांना वाऱ्यावर सोडणार नाही, ही जी भूमिका तेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली होती.. त्यांनी ती एका अर्थाने पार पाडली !