मानोरा (Shivaji Jayanti) : स्थानिक मा.सु.पा. कला, विज्ञान व कै. पां. ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित तालुकास्तरीय ऑनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व प्रेरणादायी व्याख्यान अभूतपूर्व उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विक्रमी सहभागामुळे संपूर्ण परिसरात शैक्षणिक आणि ऐतिहासिक अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत अ गटातून ६८५ तर खुल्या गटातून ४४९ अशा एकूण ११३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला भव्य प्रतिसाद दिला. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडविले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा एवढ्या मोठ्या संख्येने झालेला सहभाग ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब ठरली. यानंतर पार पडलेल्या व्याख्यानमालेत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांनी शिवरायांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजन, अचूक रणनीती आणि लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी मांडणी केली. “यशस्वी नेतृत्वासाठी दूरदृष्टी, शिस्त आणि ध्येयाप्रती निष्ठा आवश्यक असते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज,” असे ते म्हणाले.
डॉ. स्नेहा टोम्पे यांनी “शिवचरित्रातून काय शिकावे” या विषयावर ओजस्वी मार्गदर्शन करताना शिवरायांचे सुयोग्य प्रशासन, सर्वधर्मसमभाव, न्यायप्रियता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा सखोल उहापोह केला. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. ए. वाय. अली यांनी करताना उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल ढवळे यांनी प्रभावी, ओघवत्या व समर्पक शैलीत पार पाडले. तर आभार प्रदर्शन प्रा. पंकज गावंडे यांनी व्यक्त करत सर्व मान्यवर, सहभागी विद्यार्थी व आयोजन समितीचे आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध नियोजन, ऐतिहासिक जाणीव आणि प्रेरणादायी विचारांनी समृद्ध ठरला. स्पर्धा आणि व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, राष्ट्राभिमान आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात यश आले. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही अशाच दर्जेदार व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. वरील तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा व विशेष व्याख्यान हे कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर एन. एस. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.




