नागपूर (Shivaji Maharaj) : २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) राज्याभिषेकाचे सार्थ त्रीशती वर्ष असून त्यानिमित्ताने २६ ते २९ जून २०२४ दरम्यान जळगाव येथे विश्वातील पहिले श्री. शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी धर्मभास्कर सदगुुरूदास महाराज नावाने परिचित असलेले ‘शककर्ते शिवराय’ या विश्वप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुख (Vijayrao Deshmukh) राहणार आहेत.
26 जून पासून जळगांव येथे विश्वातील पहिले संमेलन
चार दशकांपासून शिवचरित्राचे गाढे अभ्यासक व वक्ते असलेले शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी शिवचरित्राशी निगडीत असलेल्या शेकडो साधनांचे मूलग्राही अध्ययन केले असून त्यांनी ‘शककर्ते शिवराय’ हे द्विखंडात्मक शिवचरित्र लिहिलेले आहे. (Shiv Charitra) शिवचरित्र चिंतनात या ग्रंथामुळे मोलाची भर घातली असून संशोधक, अभ्यासक, वाचकांसाठी एक नवे दालन खुले करून दिले आहे. शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे, या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या गादीचे वारस श्रीमंत शिवाजी राजे भोसले आणि नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिवकाळातील छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) सोबत असणारे ७५ सरदार घराण्यांचे वारसदार तसेच, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नाणे संग्रह, शस्त्रप्रदर्शन, पगडी प्रदर्शन, चित्र प्रदर्शनी, वीरगळ व आरमार प्रदर्शनासोबत गोंधळ, जागरण, पोवाडाद्व शिवाकालीन कलांचे सादरीकरण, संत साहित्य, शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आदी विषयांवर परिसंवाद, मुलाखती, अभ्याससत्र असे भरगच्च कार्यक्रम साहित्य संमेलनात राहणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने संमेलनात सामील व्हावे, असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख, नियंत्रक रवींद्र पाटील पाचोरा, इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे यावल यांनी केले आहे.