उदगीर (Udgir) :- राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) शरदचंद्र पवार पक्षाने राजकीय रणधुमाळीत आघाडी घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, राज्यात पक्षाच्या वतीने शिव स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट पासून जुन्नर येथून सुरू होणारी सदरील यात्रा दिनांक १४ ऑगस्ट रोजी उदगिरात धडकणार आहे.
पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आगामी काळात उदगिरात तुतारीचा आवाज बुलंद होणार
माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Chandra Pawar) पक्षात प्रवेश केल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) पक्षात मोठे बळ आले असून राज्याचे सरचिटणीस तथा स्टार प्रचारक बस्वराज पाटील नागराळकर, दुसरे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव मुळे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आगामी काळात उदगिरात तुतारीचा आवाज बुलंद होणार आहे. सत्ताधारी पार्टीच्या कथित फोडाफोडीच्या व खच्चीकरणाच्या राजकारणाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रव्यापी ‘शिवस्वराज्य’ यात्रा काढणार आहे. लोकप्रिय अभिनेते व राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) हे या यात्रेचं नेतृत्व करणार असून अनेकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्वागतासाठी जोरदार तयारी..
विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारीचे वातावरण निर्माण करण्यासाठी शिव स्वराज्य यात्रा अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. सदरील यात्रा यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसली असुन बुथनिहाय नियोजन केले जात आहे. शिव स्वराज्य यात्रेत तमाम उदगीरकर मंडळींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.