वाशिम(Washim):- गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलेचा जवळपास 20 फूट अंतराचा रेल्वे मार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार कारंजा शहरात उघडकीस आला त्यामुळे एकच खळबळ उडाली असून रेल्वे विभाग (Railway Department) मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. अज्ञातांनी जवळपास 20 फूट अंतराचा रेल्वे मार्ग कटरच्या सहाय्याने कापून वेगळा केला आणि त्याखालील जवळपास दोन ते तीन क्विंटल वजनाचे लोखंड गायब केले. हा धक्कादायक प्रकार कारंजा शहरातील मुस्लिम कब्रस्तानच्या(Muslim cemetery) बाजूला दोन दिवसापूर्वी घडला. ब्रिटिशांनी त्या काळी शकुंतलेकडे एक ड्रिम प्रोजेक्ट म्हणून बघत मूर्तिजापूर ते यवतमाळ(Yavatmal) हा भाग जोडला होता.
शेकडो प्रवासी दररोज मुर्तीजापुर ते यवतमाळ असा प्रवास करीत
त्यामुळे ब्रिटिश (British) भारत सोडून गेले तरीही आज पर्यंत शंकुतलेचा ताबा मात्र त्यांच्या कडेच राहील्याने अलीकडच्या काळात शकुंतलेला शेवटची घरघर लागली आणि हा रेल्वे मार्ग शेवटी बंद झाला. परंतु शकुंतला सुरू असताना मात्र ती विदर्भाची शान होती आणि शकुंतलेच्या माध्यमातून शेकडो प्रवासी दररोज मुर्तीजापुर ते यवतमाळ असा प्रवास करीत होते. शकुंतलेतून अगदी गरिबातल्या गरीब प्रवाशाला प्रवास करता येत असल्याने गरिबांचा रथ अशी तिची ओळख निर्माण झाली होती. शकुंतला बंद झाल्यानंतरही पुन्हा कधीतरी शकुंतला सुरू होईल असा विश्वास अनेकांच्या मनात असतानाच शकुंतलेचा चक्क रेल्वे मार्गच चोरीला गेल्याने आता पुन्हा शकुंतला सुरू होणार की नाही ? अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.
रेल्वेमार्ग चोरीला गेल्याचा प्रकार घडून दोन दिवस उलटले
मागील काही वर्षापासून शकुंतला बंद असल्याने या रेल्वे मार्गाकडे रेल्वे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आणि त्याचाच परिणाम म्हणून चोरट्यांनी चक्क रेल्वे मार्गाची चोरी करण्यापर्यंत मजल मारली. रेल्वेमार्ग चोरीला गेल्याचा प्रकार घडून दोन दिवस उलटले तरीही अद्याप पर्यंत रेल्वे विभागाला याबाबत माहिती नसल्याचे बोलल्या जात आहे. इतर राज्यात आतापर्यंत रेल्वे मार्ग चोरीच्या घटना घडल्याचे ऐकले आहे परंतु कारंजात मात्र हा प्रकार घडला नव्हता त्यामुळे आता कारंजाचे देखील बिहार (Bihar) होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. कारंजा शहरात आतापर्यंत नगदी रोकड, दुचाकी चारचाकी व मालवाहू वाहनांची चोरी(Theft of vehicles) झाल्याचे ऐकले होते परंतु आता मात्र रेल्वे मार्गाची चोरी झाल्याने शहरवासीयांकडून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.