कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळख
हिंगोली (Hingoli Police) : नांदेड येथून बदली झालेले पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी निघाले असून बुधवारी पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगितले.
सध्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांची पुणे येथे बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यांचा पदभार अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना १३ ऑगस्ट रोजी गृह विभागाने राज्यातील १७ वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांबाबत आदेश काढले. ज्यामध्ये यापूर्वी नांदेड येथील पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे बदलीनंतर पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असताना त्यांची हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज १४ ऑगस्ट रोजी ते पोलिस अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. नूतन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड येथे गुन्हेगारीवर चांगलीच वचक निर्माण केली होती. तसेच अनेक गंभीर गुन्हेही उघडकीस आणले होते.दबंग कामगिरी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशासनातील त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता हिंगोली जिल्ह्याला भविष्यात गुन्हेगारीवर आळा येण्याची शक्यता आहे.
मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असलेले राज्यसेवेतील अधिकारी श्रीकृष्ण कोकाटे यांनी अतिरीक्त पोलिस अधिक्षक म्हणून लातूर व वसई येथे तर नाशिक, ठाणे व मुंबई येथे उपायुक्त म्हणून कामगिरी बजावली आहे. नांदेड शहरात गुन्हेगारीवर त्यांनी चांगलीच वचक निर्माण केली होती.