देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Silk Ratna Award) : जिल्ह्यातील तीन शेतकर्यांना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते नुकतेच रेशीम रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रेशीम संचालनालय, नागपूर आणि वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील नव निर्मित नियोजन भवन येथे १० व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचे औचित्य साधून तुती आणि टसर रेशीम उद्योगातून ज्यांची आर्थिक उन्नती एका वर्षात १ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आहे, अशा यशस्वी शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयान्वये लक्षाधीश रेशीम शेतकर्यांना पुरस्कार देण्याविषयी शासनाकडून मान्यता देण्यात आली होती.
नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून सन २०२२- २३ यावर्षात प्रती एकरी १ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणार्या शेतकर्यांची निवड करण्यात आली. त्यामधून सर्वाधिक उत्पन्न असणार्या शेतकर्यांची प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रथम पुरस्कारासाठी ११ हजार रुपये, द्वितीय पुरस्कारासाठी ७ हजार ५०० रुपये व तृतीय पुरस्कारासाठी ५ हजार रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ, साडी आणि प्रशस्तीपत्र देऊन सपत्नीक सन्मान मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रेशीम संचालीका वसुमना पंत, आयुक्त वस्त्रोद्योग अविष्यांत पंडा, व अतिरिक्त आयुक्त, माधुरी चवरे खोडे, वस्त्रोदयोग उपसचिव श्रद्धा कोचरेकर, रेशीम विभागाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, सहायक संचालक हेमंत लाडगावकर, कक्ष अधिकारी अंजुम पठाण उपस्थित होते.
यांना मिळाला पुरस्कार
जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार विजेते शिवाजी झोडे, रा. देवळी गुजर ता.जि. नागपुर, व्दितीय पुरस्कार संजय नेवारे रा. कान्हादेवी ता. पारशीवणी, तृतीय पुरस्कार नारायण लक्ष्मन लोखंडे रा. गुमगाव ता. हिंगणा यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.