जलेश्वर प्रमाणे शिर्रेहक शहा बाबा तलावाचे होणार सौंदर्यीकरण
हिंगोली (Silt removal) : शहरातील जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरण कोट्यावधी रूपये खर्चातून केले जात आहे. त्याच धर्तीवर शिर्रेहक शहा बाबा तलावाचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. या निमित्त १७ जानेवारी शनिवार पासून तलावातील गाळ उपसा करण्यास सुरूवात झाली आहे.
हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या सौंदर्यीकरणाचा विडा आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी उचलला होता. त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून तलावाचे सौंदर्यीकरण करण्या करीता केंद्र व राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. या निमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी तलावाची पाहणी केल्यानंतर हा तलाव सौंदर्यीकरण करण्या करीता हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर तलावाच्या सौंदर्यीकरणा करीता कोट्यावधी रूपयाचा निधीही केंद्र शासनाच्या माध्यमातून प्राप्त झाला.
आज परिस्थितीमध्ये तलावातील गाळ उपसा केल्यानंतर अंतर्गत कामे पूर्ण होऊन तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. याच धर्तीवर आता आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी शिर्रेहक शहा बाबा तलावाचे सौंदर्यीकरण करण्याकडे अधिक लक्ष घातले आहे. महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात या सौंदर्यीकरणाला सहमती दर्शविली आहे.
दरम्यान शिर्रेहक्क शहा बाबा तलावाची जी जूनी भिंत आहे ती पाडून खोलिकरण करून नवीन भिंत उभारली जाणार आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणाला जवळपास १२ कोटी रुपयाचा निधी अपेक्षित आहे. सौंदर्यीकरण संबंधाने शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय सल्लागार समिती पुणे यांनी मान्यता दिली आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणा करीता डिपीटीसी मधून निधी उपलब्ध करून घेतला जाणार आहे. एकुणच परिस्थितीत एकीकडे जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरण सुरू असताना आता शिर्रेहक शहा बाबा तलावाच्या सौंदर्यीकरणालाही मुहूर्त मिळाला आहे.
१७ जानेवारी शनिवार पासुन तलावातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे. जेसीबीच्या माध्यमातून हा गाळ उपसा करून टिप्पर व ट्रॅक्टर मध्ये भरून दिला जात आहे. शेतकर्यांनी हा गाळ न्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




