परभणी/गंगाखेड(Parbhani):- तालुक्यातील गोदावरी नदीच्या पट्ट्यात काही भागात दि. ३० जून रविवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस (Rain)झाल्याने परिसरातील शेतात तळे साचल्यासारखी स्थिती निर्माण होऊन नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहे.
गावात पाणी साचून पहावे तिकडे पाण्याचे तळे साचल्याचे चित्र
गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पट्ट्यात गोदावरी काठावर असलेल्या मैराळसावंगी, खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मुळी, धारखेड, आदी गावांत व महातपुरीच्या काही शिवारात दि. ३० जून रविवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तब्बल दोन तास झालेल्या पावसात अतिवृष्टी (heavy rain) होऊन ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतात, रस्त्याच्या बाजूला तसेच गावात पाणी साचून पहावे तिकडे पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले. गोदावरी (Godawari River)पट्ट्यात दोन तासात सुमारे ७० मिली मिटर पाऊस झाल्याची नोंद खळी पाटी जवळील गोदावरी नदी पुलालगत असलेल्या केंद्रीय जल आयोगाच्या (Central Water Commission) पर्जन्यमापन यंत्रात झाली असून परिसरातील शेत शिवारात साचलेल्या पाण्यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले असून नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहे. तर गंगाखेड परिसरात मात्र १० ते १२ मिली मिटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.