मानोरा (Manora) :- मानवाने स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. शासकीय स्तरावर झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेचा कितीही उदघोष होत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. वृक्षतोड थांबता थांबत नाही आहे. मानोरा (Manora) तालुक्यात वन परिक्षेत्रात राजरोस वृक्षांची कत्तल ही बाब नित्याचीच झाली आहे.
अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरण धोक्यात
वृक्ष हे पृथ्वी व पर्यावरणाचे चैतन्य आहे. बेसुमार वृक्षतोडी मुळे पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस ढासळत चालले असून असमतोल वाढला आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर शतकोटी वृक्ष लागवडी सारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. वृक्षांचे संगोपन व संवर्धन यावर कोट्यवधींचा खर्च होतो. दुसरीकडे मात्र शेतामधील हजारो झाडांवर ठेकेदारांच्या माध्यमातून कुऱ्हाड चालविली जात आहे. तालुक्यातील काही भागात तोडून ठेवलेल्या लाकडांमुळे मोकळ्या मैदानांना जणू लाकूड आगाराचे स्वरूप आले आहे.
वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
आंबा, चिंच, टेंभुर्णी, बोर, जांभूळ अशा फळझाडांसोबतच कडुलिंब, अंजन, कीन, बाभूळ, मोह, सागवान अशा वृक्षांची लागवड शेतशिवारात केली आहे. अनेक वर्षे जुनी असणारी ही झाडे शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून कापण्याचा सपाटा सध्या लाकूड ठेकेदार करीत आहेत. जळाऊ लाकूड वगळता इतर कोणत्याही प्रकारचे वृक्ष तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते. वनविभागाशी साठगाठ असल्याने परवाना मिळविण्यापासून कटाई व वाहतुकीचा खर्च ठेकेदार उचलतो. त्यामुळे थोड्या रकमेच्या लालसेपोटी बहुमुल्य असलेली वृक्षसंपदा नष्ट केली जात आहे.
जैवविविधतेला धोका
विविध प्रजातींचे हे डेरेदार वृक्ष लाकूड ठेकेदार काही वेळांत भुईसपाट करून टाकतात. एक झाड मोठे करण्यासाठी २० ते २५ वर्षांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे या झाडांवर वटवाघळे, लहान-मोठ्या पशूपक्ष्यांचा निवारा असतो. शेतशिवारात डेरेदार वृक्षांची कत्तल होत असल्याने जैवविविधतेला सुद्धा धोका उत्पन्न होत आहे.