नाशिक(Nashik) :- रेल्वेतून प्रवासात अनेकदा लहान-मोठ्या घटना घडत असतात, आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून अचानक धूर (smoke) निघाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. नाशिकहून मुंबईकडे ही ट्रेन जात असताना अचानक ट्रेनच्या (Train) डब्ब्याखालून धूर येत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात येताच बोगीत गोंधळ उडाला होता. अप मार्गाच्या गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट (Over heat) होऊन घासल्याने हा धूर निघत असल्याचे मॅकेनिकने गाडीची तपासणी केल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे, रेल्वे मॅकेनिकच्या सल्ल्यानंतर गाडी इगतपुरी स्थानकावर नेण्यात आली होती. मात्र, या घटनेनंतर प्रवाशांमध्ये चांगलीच धांदल उडाली होती.
अचानक धूर सुरू झाल्याने प्रवाशांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे, काही प्रवाशांनी गाडीची चैन ओढून रेल्वेच्या लोको पायलटला सावधान केले तर, काहींनी गार्ड व रेल्वे चालकास घटनेची माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच, गार्ड आणि ट्रेन(Train) चालकाने प्रसंगावधान राखत जागेवरच गाडी थांबवली. त्यानंतर, गाडी थांबताच सर्व प्रवासी पटरीवर उतरले. यावेळी, ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी प्रवाशांची मोठी घाईघडबड पाहायला मिळाली. आपल्या जीवाच्या आकांतेने सर्वजण ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी धडपडत असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या घेत स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीची बोगी (Bogie) लायनर दुरुस्त करुन पुन्हा मुंबईच्या (Mumbai) दिशेने ट्रेनला रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे, प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.