परभणी (Parbhani) :- जिनिंग मध्ये दिवसभर काम करुन उरलेली रक्कम घेऊन चारचाकीने घराकडे येत असताना व्यापार्याची गाडी अडवत त्यांना मारहाण (Hitting)करुन त्यांच्या जवळील १४ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना बुधवार ५ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास परभणी ते गंगाखेड रोडवर बोरवंड शिवारामध्ये घडली. या प्रकरणी दोन अनोळखी इसमांवर दैठणा पोलिसात गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे.
परभणी ते गंगाखेड रोडवर बोरवंड शिवारातील घटना; दैठणा पोलिसात गुन्हा दाखल
रामनिवास राधेशाम शर्मा यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या राज राजेश्वर कोटेक्स प्रा.लि. कापसाच्या जिनिंग मध्ये दिवसभर काम करुन शेतकर्यांना रक्कम दिली. उरलेली साडेचौदा लाखाची रक्कम बॅगमध्ये घेऊन चारचाकीने घराकडे निघाले. यावेळी बोरवंड शिवारात दुसर्या चारचाकीने आलेल्या इसमांनी रामनिवास शर्मा यांच्या गाडीसमोर आपली गाडी उभी केली. संबंधीत वाहनातुन उतरले. त्यांनी फिर्यादीच्या तोंडावर स्प्रे मारला. रोकड असलेली बॅग हिसकाविली. फिर्यादीने बॅग दिली नाही. यावेळी आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत बळजबरीने बॅग घेऊन पोबारा केला. प्रकरणाचा तपास सपोनि. जायभाये करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परेदशी, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख, स्थागुशाचे पो.नि. विवेकानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.