कारंजा(Washim):- धनज पोलीस स्टेशन(Police Station) अंतर्गत असलेल्या विळेगाव शिवारातील ऑरगॅनिक फार्म लॅबमधून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 75 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना 3 ऑगस्ट रोजी रात्री घडली. .
अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल
या संदर्भात धनज पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. विळेगांव येथील प्रगतिशील शेतकरी राहुल रविराव यांच्या शेतात ऑरगॅनिक फार्म लॅब असून, अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री त्यातील दालमिलचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश मिळविला आणि त्यातील मुद्देमालावर डल्ला मारला. यावेळी चोरट्यांनी 35 कट्टे गहू, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा , 3 ताडपत्र्या ,5 गोणपाट , नैसर्गीक फार्मर प्रोडूसर कंपनीचा 32 कट्टे ढेंच्या, 5 पाण्याच्या टाक्या ,लॅबमधील सिलेंडर , शेगडी ,रेग्युलेटर, ताडपत्री; कोनीकल फ्लॉस , गंज , इडली कुकर असा मुद्देमाल बोलेरो पिकअपमध्ये भरून धूम ठोकली. धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश इंगळे व कामरगाव पोलीस चौकीचे चौकी अधीकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर यांच्यासह पोलीस कर्मचारी वानखडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपासासाठी श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण केले. ठाणेदार योगेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.