पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली रक्कम
हिंगोली (CM Relief Fund) : राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासून जिल्हा पोलिस दलाने पुरग्रस्त शेतकर्यांना मदतीचा हात दिला. ज्यामध्ये पोलिस दलाचे एक दिवसाचे २३ लाख ८१ हजार २२२ रुपये वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (CM Relief Fund) दिला असुन त्याचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मंगळवारी दिला आहे.
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला होता. शेती पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरामध्ये शेतकर्यांची जनावरे वाहून गेली, तर काही नागरीकही पुराच्या पाण्यात वाहून गेले. अशा परिस्थितीत जिल्हा पोलिस दलाने सामाजिक बांधिलकी जोपासून पुरग्रस्त शेतकर्यांना मदतीचा हात देण्या करीता जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुढाकार घेतला. ज्यामध्ये पुर परिस्थितीमुळे शेतकर्यावर ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमिवर पोलिस दलाने एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार २३ लाख ८१ हजार २२२ रुपये एक दिवसाचे वेतन जमा झाले. ही (CM Relief Fund) मदत पोलिस दलाच्या सर्व अधिकारी व अंमलदार, कार्यालयीन कर्मचार्यांनी स्वेच्छेने दिले आहे. या उपक्रमामागे जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वात हिंगोली जिल्हा पोलिस दलाने एकजुटीचा आणि संवेदनशिलतेचा संदेश दिला आहे. १४ ऑक्टोंबरला आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सुर्पूत केला.
यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, पोलिस उपाधिक्षक दत्ता केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, कार्यालय अधिक्षक रा.ना. पाटणकर यांची उपस्थिती होती.


