अभिनेते नाना पाटेकर यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर घेतला निर्णय
शेतकऱ्यांच्या अनेक योजना लागणार मार्गी
अमरावती (Bachu Kadu) : महाराष्ट्रामध्ये शेतकरी, गरजवंत लोकांसाठी झटत असलेल्या संस्थांची मोट बांधून राज्यभरात विविध प्रकल्प उभारण्याची योजना प्रहार संस्थापक बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी आखली आहे. त्यांनी बुधवारी रोजी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Actor Nana Patekar) यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली, आणि एका छताखाली सर्व संस्थांना घेवून बहुउद्देशिय प्रकल्प हाती घेण्याचे प्राथमिक नियोजन केले.
बच्चू कडूंनी (Bachu Kadu) सांगितले की, आमदार असताना कामाच्या व्यापामूळे अनेक अश्या जनहिताच्या योजना आहेत, ज्या शासनाच्या मर्यादेत येत नाहीत, परंतू सामाजिक संस्थांना करणे सहज शक्य आहे, अश्या जनहिताच्या मोठ्या योजना देशातील नामांकित संस्थांच्या साथीने उभारुन त्या पुर्णत्वास नेण्याची योजना आखण्यात आली आहे. बच्चू कडू (Bachu Kadu) हे पुणेतील प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी, नौशाद शेख यांनी गरिबांसाठी फक्त 30 रुपयांत ओपीडी असलेल्या एका हॉस्पिटल च्या उदघाटना निमित्ताने पुणे दौऱ्यावर होते.
योगायोगाने जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Actor Nana Patekar) यांच्या वाढदिवसानिमीत्त बच्चु कडू यांनी नानां ना दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या. नानांनी बच्चु कडू यांना घरी भेटायला येण्यास निमंत्रण दिल्यानंतर सायं 6 वाजता बच्चु कडू (Bachu Kadu) यांनी नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी जाऊन नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर विविध विषयांवर चर्चा झाली.
स्वामिनाथन आयोगापासून ते शेतक:यांच्या प्रश्नांवर मंथन झाले. त्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मालाला आज योग्य भाव मिळणे कठीण झालेले आहे, त्यामुळे नवनवीन शेतकरी हे नैराश्यात जात आहे, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दर्जेदार मालाला योग्य भाव मिळून देण्यासाठी ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ तसेच ‘मागणी तसा पुरवठा’ तत्त्वावर काही मोठ्या शहरांमध्ये प्रयोग राबवता येईल का यावर सविस्तर चर्चा झाली,यातून राज्यातील व राज्याबाहेरील संस्थांना एकत्र आणून शेतकरी, पाणी, माती, पशुसंवर्धन यांच्या संरक्षणार्थ काम करण्यावर चर्चा झाली, गाव खेड्यातील अपंग, दिव्यांग, विधवा, परितक्त्या, गरजवंत एकल महिला तथा महिला बचत गटाच्या काही उद्यमशील महिलांना शेळी गटाचे वाटप करून यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे तसेच गरजवंताकरिता नाममात्र पैश्यांमध्ये महागड्या सुविधा कश्या उपलब्ध करवून द्यायच्या, यावरही चर्चा करण्यात आली.
यावेळी बच्चु कडू (Bachu Kadu) यांच्यासोबत आलेले त्यांचे चिरंजीव देवा कडू यांची सुद्धा नानांनी आपुलकीने चौकशी केली. बच्चु कडू यांच्या समवेत उद्धव ढवळे, महेश बडे, मनोज भोजने आदी उपस्थित होते. बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी अचलपूर मतदारसंघात प्रत्येक गावात धरणातून शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित केलेली आहे, योजनेला पुढील भविष्यात काही देखभाल दुरुस्तीच्या कामावर योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, त्याकरता गेल्या कित्येक वर्षापासून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण येथे सदिच्छा भेट दिली. बच्चु कडू यांना खडकवासला धरणाची माहिती शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर-फुटाणे व इतर कर्मचा:यांनी दिली.