समाजसेवक डॉक्टर श्याम जाधव ( नाईक ) यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन!
मानोरा (Dr. Shyam Jadhav) : आकांक्षित वाशिम जिल्हयातील अति मागासलेल्या मानोरा तालुक्या शासकीय ई – क्लास मालकीच्या जागेवर सन 1985 ते 2000 या कालावधीत अत्यंत गरीब, भूमिहीन, कष्टकरी, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणार्या व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या नागरिकांना केवळ पोटासाठी व डोक्यावर छप्पर मिळावे, या एकमेव उद्देशाने त्यांचे शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमानुसार नियमाकुल करण्याची मागणी समाजसेवक डॉक्टर श्याम जाधव (नाईक) (Dr. Shyam Jadhav) यांनी जिल्हाधिकारी यांना दि. 16 जानेवारी रोजी पाठविलेल्या एका निवेदनाद्वारे केले आहे.
निवेदनानुसार मानोरा तालुक्यात जवळपास 25 ते 40 वर्षांपासून शेकडो अतिक्रमणधारक कुटुंबासह वास्तव्य करत आहेत. शासकीय ई – क्लास जागेवर सदर वास्तव्यास असलेली सुमारे शेकडो कुटुंब अत्यंत दयनीय परिस्थितीत जीवन जगत आहेत. यामध्ये मोलमजूर, शेतमजूर, हातगाडीवाले, बांधकाम मजूर, महिला बचत गटातील कामगार, वृद्ध, अपंग, विधवा महिला व लहान मुले मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा आहे. पण यापैकी ‘निवारा’ ही गरज पूर्ण करण्यासाठी शासन व प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.
या मागणीसाठी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन लोकप्रिय आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांनी शासनाकडे अनेक वेळा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. त्यावेळी गरीब कुटुंबांना न्यायही मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला, पण त्यांच्या अकाली निधनाने समस्या व प्रश्न अधुरे राहिले आहेत.
मानोरा तालुक्यात आदिवासी आणि बंजारा बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास असुन मागील अनेक वर्षांपासून या नागरिकांचे आयुष्य भीती, अनिश्चितता व असुरक्षिततेच्या सावटाखाली चालले आहे. दर पावसाळ्यात घर कोसळेल की काय, कधीही नोटीस येईल की काय, मुलांचं शिक्षण खंडित होईल की काय या भीतीत ही कुटूंबे दिवस काढत आहेत. शेकडो कुटुंबांनी आपल्या परीने त्या जागेचा विकास केला आहे.
वीज जोडणी, पाणी व्यवस्था, लहान दुकाने, हातमजुरीची साधने, शाळकरी मुलांचे शिक्षण सर्व काही त्यांनी अत्यंत मर्यादित साधनांमध्ये उभे केले आहे. त्यामुळे अत्यंत गरीब व बेघर कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्याबाबत सकारात्मक व तात्काळ कार्यवाही करण्याच्या विनंतीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना समाजसेवक डॉ. श्याम जाधव नाईक (Dr. Shyam Jadhav) यांनी पाठविले आहे.




