परभणीत पत्रकार परिषद मागण्या मान्य झाल्याने निर्णय
भीमराव हत्तीअंबीरे यांची माहिती
परभणी (Somnath Suryavanshi) : शहरात झालेल्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) , विजय वाकोडे यांचे निधन झाले. आंदोलनातील अनेक निरापराधावर गुन्हे दाखल झाले. या सर्व प्रकरणात न्याय मिळावा म्हणून परभणीतून १७ जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने लाँग मार्च काढण्यात आला. या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्या मध्यस्थीने बहूतांश मागण्या मान्य झाल्या. त्या पूर्ण करण्यासाठी शासनाला एक महिन्या अवधी दिल्याने लाँग मार्च तुर्त स्थगित करण्यात आला असल्याची माहिती समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परभणी ते मुंबई लाँग मार्चची सांगता नाशिक येथे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आ. सुरेश धस, परभणीचे अपर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यासंदर्भात झालेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी सावली विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे बोलत होते. परिषदेला आशिष वाकोडे, सिध्दार्थ भराडे, विश्वजीत वाघमारे आदींची उपस्थिती होती. यावेळी लाँगमार्चचे प्रणेते आशिष वाकोडे म्हणाले की, शासनाने आंदोलनकर्त्यांच्या बहूतांश मागण्या मान्य केल्या आहेत.
यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) व विजय वाकोडे यांच्या कुटूंबातील एका सदस्यास एक महिन्याच्या आत शासकिय सेवेत घेणार, पाच पोलिस अधिकार्यांचे निलंबन करुन न्यायालयीन चौकशी नंतर दोघी पोलिस अधिकारी, कर्मचार्यांवर गुन्हे दाखल होणार, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे चौकशीअंती मागे घेण्यात येतील, शिकलगार युवकावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होणार, न्यायालयीन चौकशी महिन्यात पूर्ण करण्यात येणार, या लेखी आश्वासनानंतर लाँग मार्च स्थगीत करण्यात आल्याचे आशिष वाकोडे यांनी सांगितले. मात्र आंदोलनाला बदनाम करण्याचे राजकारण होत आहे. पैशाचे आमिष दाखवले जात आहे. मात्र आम्ही सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) व विजय वाकोडे परिवाराला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असे आशिष वाकोडे यांनी सांगितले.