शेंगा न लागल्याने शेतकरी हवालदिल!
मानोरा (Soybean Crop) : तालुक्यातील आसोला खुर्द शेतीमधील अडीच एकर महाबीजचे सोयाबीन पिक सध्यस्थितीत हिरवेगार असुन शेंगा न लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत पाहणी करून सबंधित महाबीज कंपनीकडून (Mahabeez Company) नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी तहसीलदार व कृषी अधिकारी याजकडे महीला शेतकरी द्वारकाबाई पांडुरंग मनवर यांनी केली आहे.
संसाराचा वर्षभर गाडा कसा चालवायचा या विवंचनेत अल्पभूधारक शेतकरी कुटुंब?
सविस्तर असे की, महीला शेतकरी यांचे पती पांडुरंग मनवर यांनी खरीप हंगामाच्या पेरणीकरिता महाबीजचे २ बॅग व रासायनिक खत कृषी सेवा केंद्राकडून नगदीने पैशाने खरेदी करून पेरणी केली. सोयाबीन काढणीला आला तरी सद्यस्थितीत शेतात हिरवेगार सोयाबीन पिक उभे असुन झाडाला शेंगा नाही. आता उत्पादन शुन्य होणार असल्याने पेरणीसाठी उधार, उसने घेतलेले पैसे कसे फेडायचे आणि संसाराचा वर्षभर गाडा कसा चालवायचा या विवंचनेत अल्पभूधारक शेतकरी (Farmers) कुटुंब जीवन जगत आहे. त्यामुळे महाबीज कंपनीकडून नुकसान भरपाई वसूल करून न्याय द्यावा, अशी मागणी पिडीता शेतकरी द्वारकाबाई मनवर यांनी केली आहे.


