Wardha :- यावर्षीच्या सोयाबीन हंगामात उत्पादन खर्च वाढला आणि दर मात्र तळाला गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) गणित पूर्णपणे कोलमडले आहे. जिल्ह्यातील कोसुर्ला (मोठा) येथील शेतकरी उमेश भोकटे यांचा यंदाच्या हंगामातील अनुभव याच स्थितीचे जिवंत प्रतिनिधिक उदाहरण ठरले आहे. सोयाबीनला क्विंटलमागे ७५० रुपये असा अल्प दर मिळाल्याने शेतकरी हताश झाला आहे.
कोसुर्ला येथील उमेश भोकटे यांना फक्त ७५० रुपये क्विंटल दराने मिळाला चुकारा!
भोकटे यांनी या वर्षी ७ बॅग सोयाबीनची लागवड केली होती. यासाठी बी-बियाणे खरेदीस २१ हजार रुपये, पेरणीस ७ हजार रुपये, तसेच तणनाशक, कीटकनाशक, खत या बाबींसाठी २० हजार रुपये असा एकूण खर्च जवळपास ४८ हजार रुपयांवर गेला. याशिवाय मशागतीचा खर्च, मजुरी, पाण्याचा खर्च या गोष्टींचा विचार केला तर एकूण खर्चाचा आकडा आणखी वाढतो. परंतु शेतातील सोयाबीन विक्रीतून या शेतकऱ्यांना मिळालेला चुकारा केवळ ७२४८ रुपये इतकाच आला. म्हणजे क्विंटल दराने फक्त ७५० रुपये मिळाले. अशा परिस्थितीत उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळालेला परतावा अत्यंत तुटपुंजा असल्याने शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे.
शासनाकडून तातडीने खरेदी केंद्र सुरु करून किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची मागणी
भोकटे यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी हवामानातील अनिश्चितता, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील दरघसरण या तिहेरी आघाडीवर तोंड द्यावे लागले आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभाव प्रत्यक्ष बाजारात मिळत नसल्याने शेतकरी दलालांच्या आणि व्यापाऱ्यांच्या दयेवर आहेत. “सोयाबीनचा भाव ७५० रुपये क्विंटल इतका मिळत असेल, तर पुढे शेती कशी चालवायची हा मोठा प्रश्न आहे.” असे उमेश भोकटे सांगतात. दरम्यान, परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही याच समस्येला सामोरे जावे लागत असून शासनाकडून तातडीने खरेदी केंद्र सुरु करून किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची मागणी होत आहे. अन्यथा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पेरणीचे नियोजन करणे कठीण होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.