शहरात शेतकरी शोधत आहे नोंदणी केंद्र!
मानोरा (Soybean Registration Center) : राज्यात आज दि. ३० ऑक्टोबर पासून सोयाबीन खरेदीसाठी नाफेडची ऑनलाईन नोंदणी केंद्र सुरू झाले आहे. परंतु मानोरा शहरात खरेदी विक्री संघ, जिनिंग प्रेसिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह इतर ठिकाणी नाफेडचे नोंदणी सेंटर दोन दिवसापासून बंद असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी नोंदणी केंद्राची शोध घेत आहेत. दुसरा दिवस उलटूनही नोंदणी सेंटर बंद असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसत नोंदणीविना खाली हात परत जाण्याची पाळी आली आहे.
राज्यभर शासनाने सोयाबीन नोंदणीसाठी नाफेडचे खरेदी सेंटर गुरुवार ( दि. ३० ) पासून सुरू केले आहे. मानोरा शहरात ३ नाफेडचे सोयाबीन नोंदणीसाठी सेंटर मंजूर असल्याचे समजते पण पहिल्या व दुसऱ्या दिवशी एकही ऑनलाईन नोंदणी सेंटर सुरू झाले नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी कागदपत्र घेऊन शहरात अनेक ठिकाणी चकरा मारून देखील नोंदणी सेंटर न सापडत नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.
नोंदणी सेंटर सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची पंचाईत!
शहरात पहिल्या दिवशी नोंदणी सेंटर बंद होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी एका जीनिंग प्रेसिंग केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केंद्र उघडे होते. पण ते कारंजा येथील संचालकांचे होते, काही वेळातच त्याने ते बंद करून कुलूप लावल्याने दिवसभर सोयाबीन उत्पादक शेतकरी नोंदणी साठी थांबून पुन्हा ते न उघडल्याने आल्या पावली घरी गेले.
३ खरेदी केंद्र मंजूर असल्याची माहिती!
मंगरूळपीर, कारंजा येथे ३० ऑक्टोबर पासून सोयाबीनचे नोंदणी केंद्र सुरू झाले आहे. मात्र मानोरा येथे दोन दिवस उलटूनही नोंदणी केंद्र सुरू न झाल्याने जिल्हाधिकारी व उपनिबंधक यांनी चौकशी करून नाफेडचे केंद्र संचालकावर कार्यवाही करावी. व तात्काळ नोंदणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती देवनाथ भोयर, आमगव्हाण येथील प्रगतशील शेतकरी सुधाकर चौधरी व सुनील देशमुख कोंडोलीकर यांनी केली आहे.
