परभणी (Parbhani) :- सेलू ते पाथरी रोडवर असलेल्या प्रसाद जिनिंग कमोडिटी प्रा. लि. परिसरात ठेवलेले सोयाबीनचे दिडशे कट्टे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नोव्हेंबर २०२४ मध्ये घडली होती. सोयाबीन (soybeans) खरेदी केलेले पावती बुक सापडल्याने या प्रकरणी २० मार्चला सेलू पोलिसात तक्रार देण्यात आली. अनोळखी चोरट्याने ३ लाख १५ हजार रुपये किंमतीचे सोयाबीन चोरुन नेल्याची तक्रार देण्यात आली आहे.
अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल
प्रभुदयाल मंत्री यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मालकीची प्रसाद जिनिंग कमोडिटी प्रा. लि. आहे. या जिनिंगवर शेती मालाची खरेदी केली जाते. जिनिंग परिसरात त्यांनी सोयाबीनचे जवळपास चारशे ते साडे चारशे कट्टे ठेवले होते. नोव्हेंबर महिन्यात या कट्ट्यापैकी दिडशे कट्टे चोरीला गेले. या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पाहणी देखील केली. मात्र त्यावेळी सोयाबीन खरेदीचे पावतीबुक सापडले नसल्याने तक्रार देण्यात आली नाही. पावती बुक मिळाल्यावर गुरुवार २० मार्च रोजी सेलू पोलीस ठाणे गाठत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.