चार सामन्यांत चार विजयांसह भारताची विजयी घोडदौड कायम
जालंधर (Indian hockey team wins) : कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या धडाकेबाज हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मलेशियाचा 4-2 गोलने पराभव केला. रविवारी झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने सलग चौथा विजय मिळवत स्पर्धेतील आपली विजयी मालिका कायम राखली. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थानही निश्चित केले आहे.
या (Indian hockey team wins) सामन्यात हरमनप्रीत सिंगने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या, 33व्या आणि 58व्या मिनिटाला गोल नोंदवले. त्याने दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर, तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला. याशिवाय सुखजीत सिंगने 43व्या मिनिटाला मैदानी गोल करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मलेशियाकडून अखिमुल्ला अन्वरने 25व्या मिनिटाला, तर शेलो सिल्व्हेरियसने सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला गोल केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. मात्र, तिसऱ्या सत्रात हरमनप्रीतने गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सुखजीतच्या गोलमुळे भारताची स्थिती अधिक भक्कम झाली.
सामन्याच्या अखेरच्या सत्रात पेनल्टी स्ट्रोकवर गोल करीत हरमनप्रीतने आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. उत्कृष्ट कामगिरीसाठी हरमनप्रीतला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या विजयामुळे भारताने चार सामन्यांतून 12 गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. (Indian hockey team wins) चारही सामन्यांत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची विजयी घोडदौड कायम असून आता उपांत्य फेरीतही भारतीय संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.