पारदर्शकरित्या भरती प्रक्रिया : परिक्षेसाठी ४० अधिकारी व ३०० कर्मचारी तैनात
हिंगोली (SRPF Police) : राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मध्ये २२२ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जात आहे. त्या निमित्ताने उद्या ११ ऑगस्ट रविवार रोजी चार केंद्रावर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी शनिवारी लेखी परिक्षेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. (SRPF Police) राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मध्ये रिक्त असलेल्या २२२ पदांकरीता १८ जून पासून भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. या दरम्यान उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली.
या प्रक्रियेमध्ये ३३८६ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यासाठी ११ ऑगस्ट रोजी चार केंद्रावर लेखी परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२ या दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या लेखी परिक्षेची रंगीत तालीम १० ऑगस्ट रोजी घेण्यात आली. नागपूर परिक्षेत्राचे विशेष (SRPF Police) पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एसआरपीएफ हिंगोली समादेशक पौर्णिमा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही परीक्षा प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
लेखी परिक्षेसाठी (SRPF Police) हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालय, पोद्दार इंटरॅनशॅनल इंग्लिश स्कुल तर लिंबाळा मक्ता भागातील एबीएम इंग्लिश स्कुल, वेअर हाऊस या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परिक्षेनिमित्त अमरावती परिक्षेत्राचे समादेशक कलासागर यांच्यासह सहाय्यक समादेशक एस.जी.हिरपुरकर, सुरेश कर्हाळे, डी.एस.जांभूळकर हे दाखल झाले आहेत. परिक्षेकरीता ४० अधिकारी व ३०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.