चामोर्शीतील गंभीर परिस्थितीवर माजी आ. डॉ. देवराव होळी यांचा इशारा
चामोर्शी (Farmers’ Uprising Inevitable ): चामोर्शी तालुक्यातील धान खरेदी केंद्रांमधील गोदामे पूर्णपणे भरल्याचे कारण पुढे करून अनेक केंद्रे अचानक बंद करण्यात आल्याने हजारो धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरेदी केंद्रावर रांगा लावूनही धान विक्री न झाल्याने शेतकर्यांना आपले धान परत घेऊन जाण्याची वेळ येत असून, या प्रकारामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामुळे धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा अन्यथा शेतकर्यांचा उद्रेक अटळ आहे असा ईशारा माजी आ.डॉ. होळी यांनी दिला आहे.
डॉ. होळी पुढे म्हणाले की, ‘धान खरेदी केंद्रातील संचालकांनी वेळकाढूपणा न करता साठवलेल्या धानाची लवकरात लवकर डिओ करून गोदाम खाली करावे आणि तालुक्यातील उर्वरित शेतकर्यांची धान खरेदी तातडीने सुरू करावी. अन्यथा शेतकर्यांचा संयम सुटल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
धान हे चामोर्शी तालुक्यातील शेतकर्यांचे मुख्य पीक असून, अनेक कुटुंबांचे संपूर्ण अर्थकारण याच पिकावर अवलंबून आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असताना, धान खरेदी केंद्रे बंद ठेवणे म्हणजे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे डॉ. होळी यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील शेतकरी दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, प्रसाद गुमफलवार, अनिल प्रिसिंगलवार, दिलीप नैताम, समीर मशीद, प्रभास सरकार, शुभास किर्तूनिया, आमिर सरदार, निखिल किर्तूनिया, जगदीश रॉय, दशरथ सरकार, विनोद मल्लिक, उमेश सरकार, संजय सरकार, उत्पल बाढइ, तारक दास आदींनी माजी आ. डॉ. देवराव होळी यांच्या या आक्रमक भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.




