लातूर (Latur):- लातूर येथील ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक 12 जानेवारी रोजी लातूर येथे तिसरे राज्यस्तरीय फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होणार आहे. नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिका मलेका महेबूब शेख-सय्यद या संमेलनाच्या अध्यक्षा राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक इस्माईल शेख यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक इस्माईल शेख यांची निवड
भारतातील पहिल्या मुस्लिम (Muslim)मराठी शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त हे एकदिवसीय संमेलन होणार असून या संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित देशमुख(Amit Deshmukh) यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनास ज्येष्ठ विचारवंत डॉ. नागोराव कुंभार, खासदार डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेसचे (Congress)नेते मोईज शेख, माजी महापौर विक्रांत गोजमुंडे, ज्येष्ठ साहित्यिक फ.म. शहाजिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुस्तक प्रकाशन पुरस्कार वितरण परिसंवाद अधिक कार्यक्रमांचा या संमेलनात समावेश आहे. ‘वर्तमानातील मुस्लिम मराठी साहित्याची भूमिका’, या महत्त्वाच्या विषयावर संमेलनात परिसंवाद होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.