राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
कारंजा/ वाशिम (Marathon competition) : सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी आज हजारोच्या संख्येने कारंजेकर धावले. निमित्त होते राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या (Marathon competition) स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे १८०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
वाशिम जिल्हा ॲथलेटिक संघटना व लोकमान्य व्यायाम शाळा कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त कारंजा शहराच्या इतिहासात पहिल्यांदा १८ ऑगस्ट रोजी स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय (Marathon competition) मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. येथील विद्याभारती महाविद्यालयाच्या मैदानातून या स्पर्धेला सुरुवात होवून याच ठिकाणी स्पर्धेचा दिमाखात समारोप करण्यात आला. नाशिक, संभाजीनगर, बुलडाणा, नागपूर, अकोला, यवतमाळ, पुसद, अमरावती यासारख्या मोठ्या शहरातील स्पर्धक यात सहभागी झाले होते. या स्पर्धेत नागपूर येथील खेळाडूंचा दबदबा राहिला. १० किलो मिटरमध्ये पुरुष गटात पहिले बक्षीस सौरभ तिवारी तर महिला गटातून प्राजक्ता गोडबोले पहिली आली. हे दोन्ही स्पर्धक नागपूरचे आहेत.
तसेच ५ किलोमिटर धावण्याच्या शर्यतीत ४५ वर्षांवरील पुरुष गटात भास्कर कांबळे (वाशिम) तर महिलांमधून शालिनी चव्हाण (कारंजा) प्रथम आली. तर ४५ वर्षआतील पुरुषात मुकेश यलगर (येडगाव), महिला गटातून सारिका वायकर प्रथम आली. तीन किलो मिटर धावण्याच्या ४५ वर्षांवरील शर्यतीत पुरुषातून नागपूरचे नागोराव भोयर व महीलामधून शारदा भोयर प्रथम आली. तसेच ४५ वर्षाखालील गटात पुरूषातून आवेश चव्हाण (बुलडाणा), महिला गटातून साक्षी मिटकरी (रिसोड) पहिली आली. १९ वर्षाआतील गटात पुरुषातून लकी सम्राट तर महिलामधून नंदिनी चव्हाण (पुसद) प्रथम आली. १६ वर्षाआतील पुरुष गटात चेतन खंडारे (कारंजा) तर महिला गटातून सालीया समीर खान (यवतमाळ) प्रथम आली आहे. याशिवाय द्वितीय, तृतीय तथा प्रोत्साहन म्हणून स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, नांदेडचे उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सईताई डहाके, मुख्याधिकारी दीपक मोरे, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, प्रवीण खंडारे, ऍड. ज्ञायक पाटणी, नरेंद्र गोलेच्या, दत्तराज डहाके, देवानंद पवार, राजू पाटील राजे, डॉ. अजय कांत, डॉ.राम गुंजाटे यांच्यासह लोकमान्य व्यायामशाळेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. (Marathon competition) स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नगर परिषद प्रशासन आणि आपत्कालीन सेवेतील रुग्णवाहिका चालक, मालकांनी सहकार्य केले.
स्पर्धेला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार
स्वर्गीय प्रकाशदादा डहाके स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय (Marathon competition) मॅरेथॉन स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्यामध्ये सुनील धाबेकर, ज्ञायक पाटणी, प्रणित मोरे पाटील, देवानंद पवार, राजू पाटील राजे आदींचा समावेश होता. काहींनी स्वतः तर काहींनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत हा सत्कार स्वीकारला. यावेळी रफ अँड टफ ग्रुपला प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले.