लातूर(Latur) :- मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने लातूर येथे शनिवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ यावेळेत मुस्लिम समाजाच्या आरक्षण, शिक्षण, संरक्षण या विषयावर राज्यस्तरीय परिषद कन्हेरी चौकातील पटेल नगर येथील पटेल फंक्शन हॉल येथे होणार आहे. या परिषदेत राज्यातील नामवंत अभ्यासक चर्चा करणार आहेत.
मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचा पुढाकार
मुस्लिम समाजाच्या (Muslim community) विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने(State Govt) न्या.रंगनाथ मिश्रा कमिशन, न्या. राजेंद्र सच्चर कमिशन आण कुलगुरू डॉ. महेमुदर्ररहेमान कमिशन गठीत केले होते. या समितीने समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सुरक्षेचा आरसा सरकारसमोर ठेवला होता. मात्र त्याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी टाळण्यात आली. राजकीय पटलावर समाज पोरका झाला आहे. वारंवार, मोर्चे, आंदोलने करूनही सरकार कसलीच दखल घेत नाही. त्यांनीच नेमलेल्या समितीच्या शिफारशींकडे सर्वच सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक केली आहे. यावर विचारमंथन करण्यासाठी एकदिवसीय भव्य मुस्लिम परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता मुंबईचे आयपीएस(IPS) अब्दुल रहेमान, माजी आ. अमिन पटेल यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यातील समाज बांधवांनी राजकीय गट तट विसरून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष अजीज पठाण, अल्पसंख्यांक एनजीओ फोरमचे जाकीर शिकलगर, मुंबई विद्यापीठाचे डॉ. शहेबाज एम. मणियार, ओबीसी नेते हसीब नदाफ, सुन्नी जमाअतचे अध्यक्ष कलीम रजा कुरेशी, तहरीक ए उलेमाचे अध्यक्ष मुफ्ती वसीम कास्मी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या परिषदेत मुुंबई(Mumbai), नाशिक, पुणे(Pune), सोलापूर, बीड, सांगली, अकोला, सातारा, गडचिरोली(Gadchiroli), गोंदिया, यवतमाळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, हिंगोली, परभणी, नंदुरबार, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे अभ्यासक समाजाच्या प्रश्नांवर विचार मांडणार आहेत. या परिषदेस राज्यातील समाज बांधवांनी राजकीय गट तट विसरून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. मुस्ताक सौदागर, समन्वयक शेख शफी, हातिम शेख, शादूल सय्यद सर्फराज, शेख अन्वर यांनी केले आहे.
तीन सत्रात होणार कार्यक्रम…
परिषदेत सकाळी १० वाजता पहिल्या सत्राचे उद्घाटन मुंबईचे आयपीएस अब्दुल रहेमान, माजी आ. अमिन पटेल यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी समन्वयक उस्मान शेख राहतील. दुसऱ्या सत्रात राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले चळवळीतील अभ्यासक विचार मंथन करतील. अध्यक्षस्थानी समन्वयक साहेबअली सौदागर असतील. तर तिसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शिवसेना (ठाकरे) जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे राज्य सरचिटणीस मोहसीन राहणार आहेत. मराठा आरक्षण लढ्यातील नेते मनोज जरांगे पाटील हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत.