हिंगोली (Hingoli):- कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे शेतात सोयाबीनचे पिक फवारणी करतांना जमीनीवर पडलेल्या वीज वाहिनीवर पाय पडल्याने विजेच्या धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू (Death)झाल्याची घटना मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी घडली आहे. वीज कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप केला जात आहे.
कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील नागेश सुर्यभान मुधोळ (३७) यांचे बेलमंडळ शिवारात शेत आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नागेश हे शेतात सोयाबीनचे पिक फवारणीसाठी गेले होते. यावेळी शेतात जमीनीवर तुटून पडलेल्या विज वाहिनीवर त्यांचा पाय पडल्याने त्यांना विजेचा धक्का (Electric shock)लागून ते जागीच कोसळले. मात्र तो पोटावर पडल्यानंतर पाठीवर असलेला फवारणी पंप सुरुच होता. दरम्यान, शेजारी असलेल्या शेतातील शेतकऱ्यांनी फवारणी पंपाचा आवाज होत असतांना नागेश मात्र फवारतांना दिसत नसल्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी नागेश याचा मृतदेह आढळून आला. याप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश गोटके, जमादार शेख अन्सार, सरकटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल
पोलिस व गावकऱ्यांनी मयत नागेश याचा मृतदेह (dead body) उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून सायंकाळी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली.मृत नागेेश याच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या शेतात मागील तीन दिवसांपासून विज वाहिनी तुटून खाली पडली होती. मात्र विज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच हि घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यांतून केला जात आहे. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.