लातूर(Latur) :- देशभरात ख्याती असलेल्या लातूरच्या आडत बाजारात बाजारात केवळ एका गल्लीत सौदा काढून उर्वरित मार्केटमध्ये राजरोस पोटली व्यवहार करुन शेतकरी (Farmer)नागवला जात आहे. शेतकऱ्यांचा कळवळा असलेल्या नेत्यांच्या ताब्यातील बाजार समितीवर(Market Committee) शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा वरचष्मा असल्याने हा राजरोस पोटली व्यवहार होत असून जिल्हा उपनिबंधकही या व्यवहाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. हंगामात रोजाना २५ हजार क्विंटल तर वर्षभर रोजाना दहा हजारांवर क्विंटलची आवक होणाऱ्या या आडत बाजारात क्विंटलमागे सरासरी २०० रुपये अशी सोयाबीन (soybeans) व हरभरा उत्पादकांची सर्रास लूट केली जात आहे. महिन्याकाठी शेतकरी १० कोटींना नागवला जात आहे.
महिन्याकाठी १० कोटींना नागवला जातोय लातूरचा शेतकरी!
शेतकऱ्यांची लूट सहन करणार नाही, अशी ठेवणीतली भाषणे देणाऱ्या नेत्यांची सध्या देशात व राज्यात सत्ता आहे. असे असताना आडत बाजारांमध्ये सौद्याऐवजी पोटली व्यवहार चालणाऱ्या लातूरच्या आडत बाजाराकडे पणन मंत्रालय (ministry)दुर्लक्ष का करते? हा खरा सवाल आहे. लातूर आडत बाजारात २५ हजार क्विंटलची आवक रोजाना होते व त्यात पोटलीवरच व्यवहार होतो. यात प्रतिक्विंटल सरासरी २०० रुपये भाव कमी देत बाजारसमितीच्या संगनमताने व आडत्यांच्या सहकार्याने व्यापारी शेतकऱ्यांची सर्रास लूट करीत आहेत. म्हणजे दिवसाकाठी ५० लाख रुपयांना लातूरचा शेतकरी लुटला जात आहे. आठवड्याचे पाच दिवस याप्रमाणे महिन्यात २० दिवस आडत बाजार चालला तर शेतकऱ्यांना पोटलीतून लुटीची रक्कम महिन्याकाठी जवळपास १० कोटींवर जाते. हा पैसा नेमका कुठे जातो? हा खरा सवाल आहे.
लातूर बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता
लातूर बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. मात्र काँग्रेसच्या सभापती(President of Congress), उपसभापतींना अद्यापही बाजार समितीत होणाऱ्या या अवैध व्यवहारांना रोखण्याचे धाडस करता आले नाही. बाजार समितीत पदावर मुखवटे आणि कारभारी व्यापारी अशी वस्तुस्थिती असल्याने ‘महाराज एक अन् कीर्तनकार भलतेच!’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या विरोधात बाजारसमितीच्या निवडणुकीत उतरणारे फक्त निवडणुकीपुरतेच उगवतात. इतर पाच वर्षे त्यांचे शेतकरी व त्यांच्या पिळवणुकीविषयी काहीही देणे-घेणे नसते.
ही तर संगनमताने लूट!
एकीकडे बाजार सुधारणा, ई-एक्सचेंज, ई-नाम अशा सुधारणावादी गप्पा मारणारे सरकार बाजार समित्यांमधील जुनाट लिलाव पध्दतीतून बाहेर पडू इच्छित नसल्याचे हे द्योतक आहे. पोटली व्यवहार बंद व्हावा, यासाठी मागील काही वर्षांपासून शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. पण व्यापाऱ्यांच्या दबावामुळे बाजार समिती प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही. व्यापारी, संचालक मंडळ आणि बाजार समिती प्रशासन यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लूट चालू आहे.
– रुपेश शंके, युवा जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, लातूर