परभणी (Parbhani):- खानापुर परिसरात एका मंडप डेकोरेशन दुकानासमोर सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेले फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या तरुणांवर जुन्या वादाच्या कारणावरुन शिवीगाळ (Abusing)करत दगडफेक करण्यात आली. ही घटना सोमवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेनंतर या भागात काहीकाळ तणाव निर्माण झाला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल
अमोल गणेश उबाळे यांनी तक्रार दिली आहे. माऊली यांच्या मंडप डेकोरेशन (Mandap decoration) दुकाना समोर वैâलास ढगे, माऊली काळे यांचे अपसात भांडण होत असताना ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी अमोल उबाळे, करण उबाळे, शेखर उबाळे गेले. भांडण सोडविताना फिर्यादी सोबत असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरुन आरोपीने फिर्यादीला चापट मारली. अश्लिल शिवीगाळ केली. फिर्यादीच्या भावांनाही लाकडी काठीने मारुन जखमी करण्यात आले. तसेच दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी बाळासाहेब उर्फ हंसराज गोडबोले, नागेश गोडबोले, राहूल इंगोले, राजू उर्फ प्रशांत गोडबोले, कचरु गोडबोले, विकास सदावर्ते यांच्यावर नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. सुरनर करत आहेत. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक शरद मरे यांनी भेट दिली.