परभणी/गंगाखेड(Parbhani):- तालुक्यातील खळी पाटीजवळ गंगाखेड ते परभणी रस्त्यावर असलेल्या गोदावरी नदी (Godavari River) पुलाखाली नदी पात्रातील पाण्यात आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहा (dead body) प्रकरणी खळी येथील पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे यांनी दि. ७ जुलै रविवार रोजी रात्री उशिराने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड ते परभणी रस्त्यावर गंगाखेड तालुक्यातील खळी पाटीजवळ असलेल्या गोदावरी नदी पुलाखाली पुरुष जातीच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती दुस्सलगाव येथील परमेश्वर कचरे यांनी दि. ७ जुलै रविवार रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास खळी येथील पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे यांना दिल्याने त्यांनी याची माहिती गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत गोदावरी नदी पात्रातील पाण्यात असलेला मृतदेह दुस्सलगाव येथील भोई व गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या (fire brigade) मदतीने पाण्याबाहेर काढला तेंव्हा अंदाजे २५ ते ३५ वर्ष वय असलेल्या या अनोळखी व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा ग्रे रंगाच्या उभ्या पट्टयांचा फुल बाह्याचा शर्ट, पांढऱ्या रंगाची संडो कंपनीची बनियान, निळ्या रंगाची जिन्स पँट, सोना चांदी कंपनीची अंडरवियर आदी कपडे आढळून आले.
रात्री उशिराने अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
तसेच व्यक्तीचा डावा डोळा फुटलेला व उजव्या डोळ्याच्या बाजूस नाकावर सुजलेले, जिभ दोन्ही ओठांच्या मध्ये थोडी बाहेर आलेली व बनियानच्या आतून पोटावर दोरीने दोन दगड बांधलेले तसेच दोन्ही पायाला बांधलेली दोरी तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याची शंका आल्यामुळे व्यक्तीच्या मृतदेहाचा गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन (Autopsy) करण्यात आले. याप्रकरणी कोणी तरी अज्ञात आरोपींनी कुठल्यातरी अज्ञात कारणासाठी अनोळखी पुरुष जातीच्या व्यक्तीला जिवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटावर दोरीने दगड बांधून तो पाण्यात बुडाला पाहिजे. या हेतूने गोदावरी नदी पात्रातील पाण्यात फेकून दिल्याची फिर्याद खळी येथील पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे यांनी दिल्यावरून रविवार रोजी रात्री उशिराने अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे करीत आहेत.