मानोरा (Washim):- विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगूल वाजताच मतदार संघातील कारंजा व मानोरा या दोन तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील खेडेगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदार संघात उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच दिसून येत असुन इच्छुकांची संख्या अधिक आहे. बंजारा बहुल मतदार संघ असल्याने जातीय समीकरणच विजयाचे गणित ठरणार असल्याचे राजकीय तज्ज्ञाकडून बोलले जात आहे.
जातीय समीकरण ठरणार विजयाचे गणित
कारंजा – मानीरा विधानसभा मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मागील दोन पंचवार्षिक पासून भारतीय जनता पार्टीचे मतदार संघावर वर्चस्व आहे. ओपन मतदार संघात यंदा उमेदवारांची गर्दी असल्याने उमेदवारांची निवड करण्यासाठी राजकीय नेते व पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) शरद पवार पक्षाकडून दावा करण्यात आलेला आहे. त्यासोबतच महायुतीकडून अजित पवार गटानेही दावा केला असुन स्व आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नीला तिकीट जाहीर झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. कारंजा – मानोरा मतदारसंघात ६९ हजाराच्या जवळपास बंजारा समाजाच्या मतदारांची संख्या आहे. त्यामुळे इच्छुकांमध्येही बंजारा समाजाच्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. तसेच सर्वांनी निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच काही इच्छुकांनी प्रचारही सुरू केल्याचे चित्र मतदार संघात पाहावयास मिळत आहे.
बंजारा समाजाचे मतदार जास्त असल्याने या मतदार संघात जातीय समीकरण विजयाचे गणित ठरविणार असल्याचे राजकीय तज्ञ बोलत आहेत. तरी मविआ ची उमेदवारी घोषित झाल्यानंतरच विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असुन त्यामुळे मतदार संघातील सर्वांच्या तिकीट कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.