परभणी/गंगाखेड(Parbhani):- ऊसतोडीच्या कामासाठी उचल घेतलेल्या पैशासाठी ऊसतोड कामगाराचे बळजबरीने अपहरण केल्याची घटना दिनांक २१ मे मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर तांडा पाटीवर घडली. याप्रकरणी दिनांक २५ मे शनिवार रोजी मुकादम व अन्य एकाविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऊस तोडण्यासाठी २,७५,००० रुपये उचल घेतले
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथील शाम पोमा जाधव यांनी गेल्यावर्षी मे महिन्यात ऊसतोडीच्या (sugar cane) कामासाठी मुकादम भगवान गोपीनाथ पवार रा. आनंतनगर तांडा, विटा लिंबा पाथरी व केशव जाधव रा. उंदरवाडी तालुका सोनपेठ यांच्याकडून ऊस तोडण्यासाठी २,७५,००० रुपये उचल घेतले होते. ऊसतोड कामगार शाम जाधव यांच्या पायाचे हाड खराब झाल्याने अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यातील १,२५,००० रुपये केशव जाधव यांना परत केले होते. पती शाम जाधव यांची तब्येत बिघडल्याने आजारामुळे गेल्यावर्षी व यावर्षी ही ऊस तोडायला जाता आले नाही. फिर्यादी रेखा शाम जाधव व तिचा पती शाम जाधव दिनांक २१ मे मंगळवार रोजी गंगाखेड येथे दवाखान्यात जात असताना अंदाजे ११ वाजेच्या सुमारास मुकादम भगवान गोपीनाथ पवार व केशव जाधव हे दोघे शिवाजीनगर तांडा पाटीवर आले व त्यांनी शाम जाधव यांना बळजबरीने उचलून पांढऱ्या गाडीमध्ये टाकले.
अश्लील भाषेत शिवीगाळ करून थापडा मारून जोरात धक्का
तेंव्हा फिर्यादीने जोर जोरात ओरडले असता मुकादम भगवान पवार याने अश्लील (obscene) भाषेत शिवीगाळ करून थापडा मारून जोरात धक्का दिला व परळीच्या दिशेने निघून गेले. दोन, तीन दिवसानंतर मुकादम भगवान पवार याने फोन करून तुम्ही पैसे द्या मी माणूस पाठवितो. पैसे दिले तरच तुमच्या नवऱ्याला सोडतो नाहीतर सोडणार नाही. पैसे दिले नाहीतर त्याला जिवे मारून टाकतो अशी धमकी(threat) दिल्याची फिर्याद रेखा शाम जाधव यांनी दिनांक २५ मे रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून मुकादम भगवान गोपीनाथ पवार रा. आनंतनगर तांडा, विटा लिंबा पाथरी व केशव जाधव रा. उंदरवाडी तालुका सोनपेठ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.