हिंगोली (Sugarcane farmers) : ऊस तोडणी मजूर व मुकादम व वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणी करताना ऊस उत्पादक शेतक-यांची विविध कारणे सांगून पिळवणूक करण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी प्रत्येक कारखान्यासाठी एक तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शेतक-यांनी त्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, (Sugarcane farmers) ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची व अन्य वस्तू , सेवा यांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते. ऊस योग्य प्रकारे तोडला गेला नाही, अशा प्रकारच्या आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहेत.
राज्यात चालू 2024-25 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता वाढली असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही, याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा, याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब करू नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाच्या संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार असून कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याचे नियोजन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन, व्हॉटसॅप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात यावी.
सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कारखान्यांनी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तक्रार निवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर याची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये कारखान्याच्या गट ऑफिसवर व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याकडे परिशिष्ट अ मधील नमुन्यात घटना घडल्यावर लगेच करावी व त्याची पोहच घ्यावी. या कामाकरिता नेमलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीचे निवारण सात दिवसात करावे. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर यांनी सदरची रक्कम मजूर, मुकादम, वाहतुक कंत्राटदार यांच्या बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी.
तक्रारीचे निवारण कारखान्याकडून न झाल्यास नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड यांच्याकडे rjdsnanded@rediffmail.com या ई-मेलवर तक्रार करावी व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सत्यता पडताळून प्राप्त तक्रारीचे निवारण करावे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची (Sugarcane farmers) ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे प्रादेशिक उपसंचालक (साखर), नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.