परभणीच्या खादगाव येथील घटना
परभणी/सेलू (Sugarcane Fire) : शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत बारा एकरावरील ऊस जळून खाक झाला. ही घटना मंगळवार २१ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील खादगाव येथे घडली. यामध्ये शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सेलू तालुक्यातील खादगाव येथे गट क्रमांक ३२ मध्ये बाबासाहेब जगन्नाथ भाबट, जगन्नाथ दौलतराव भाबट, गोविंद मधुकर भाबट, विष्णु मधुकर भाबट, व्दारकाबाई मधुकर भाबट यांच्या शेतातील ऊसाला आग लागली.
विद्युत वाहिन्याच्या तारात शॉर्टसर्कीट होऊन लागलेल्या आगीमध्ये १२ एकरावरील ऊस (Sugarcane Fire) जळून खाक झाला. या घटनेत शेतकर्याचे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी सेलू येथून नगरपालिकेचे अग्नीशमन दल पाठविण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलातील कर्मचारी महेश शेरे, ऋषीकेश धापसे, सतिश अर्जुने, नितीन कापसे आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीची मागणी होत आहे.