हिंगोली (Vehicle accident) : कळमनुरी तालुक्यातील चुंचा शिवारामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा पीकअप उलटल्याने ११ जण जखमी झाल्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातील ऊसतोडीसाठी वसमत तालुक्यातील सोमठाणा या गावाकडे पीकअप वाहन क्रमांक एम.एच.२६-ए.डी.८८२३ यामधून ऊस तोडीकरीता मजुरदार आपल्या कुटुंबियांसह जात होते. वारंगा फाटा-हदगाव महामार्गावर २८ ऑक्टोंबरला दुपारच्या सुमारास पीकअप चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने (Vehicle accident) अपघाताची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात आठ जणांसह तीन मुले असे एकूण ११ जण जखमी झाल्याने उपचारासाठी त्यांना नांदेडकडे पाठविण्यात आले.