कळमनुरीतील प्रचारात सहभागी झाल्याचा व्हिडीओ
कळमनुरी/हिंगोली (Kalmanuri Panchayat Samiti) : कळमनुरी विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत प्रचार करतानाच ग्रामसेवकाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश गुरूवारी रात्री उशिराने काढण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, कळमनुरी शहरातील शास्त्रीनगर भागात एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार सुरू असताना त्या ठिकाणी ग्रामसेवक शिवशंकर गुठ्ठे हे सहभागी झाल्याचे व्हिडीओ काही सोशल मिडीयावर व्हायरल झाले. या प्रकरणात सदर व्हिडीओ निवडणूक विभागाकडे पाठविण्यात आला असता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी तात्काळ गटविकास अधिकार्यांना पत्र पाठविले.
ज्यामध्ये ग्रामसेवक गुठ्ठे हे राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी झाल्याचा व्हिडीओ प्रसारीत झाल्याने त्यांच्या विरूद्ध आपल्या स्तरावरून कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी भुते यांनी गटविकास अधिकार्यांना दिल्या होत्या. (Kalmanuri Panchayat Samiti) त्यानुसार गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे याबाबतची सविस्तर माहिती दिल्यानंतर ग्रामसेवक शिवशंकर गुठ्ठे यांना तडकाफडखी निलंबित करण्यात आल्या बाबतचे आदेश ७ नोव्हेंबरला रात्री उशिरा गटविकास अधिकारी बोथीकर यांनी काढले आहे.